Home Cities यावल बाल संस्कार विद्या मंदिरात कै. वाणी सरांचा नववा स्मृती दिन; विविध स्पर्धांतील...

बाल संस्कार विद्या मंदिरात कै. वाणी सरांचा नववा स्मृती दिन; विविध स्पर्धांतील विजेत्यांना बक्षीस वितरण

0
6


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । येथील बाल संस्कार मंडळ एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष आप्पासाहेब कै. वासुदेव राजाराम (व्ही. आर.) वाणी सर यांच्या नवव्या स्मृती दिनानिमित्त बाल संस्कार विद्या मंदिर व माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला.

स्मृती दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी गटनिहाय क्रीडा स्पर्धा, निबंध लेखन, वक्तृत्व, चित्रकला आणि रंगभरण अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांना तसेच क्रीडा व बौद्धिक कौशल्यांना वाव मिळावा, या उद्देशाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पी. एस. सोनवणे उपस्थित होते. त्यांनी शाळेसाठी व्यासपीठ (डेक्स) सप्रेम भेट दिले. मान्यवरांच्या हस्ते हे व्यासपीठ शाळेकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी कै. व्ही. आर. वाणी सरांच्या स्मृती दिनानिमित्त शाळेच्या परिसरात स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘सुंदर शाळा, स्वच्छ शाळा’ तसेच ‘प्लास्टिक पिशव्यामुक्त शाळा’ असा संकल्प करण्यात आला.

विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष महेश वाणी, प्रमुख पाहुणे वसंतराव सिताराम पाटील आणि पी. एस. सोनवणे यांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांना भविष्यातही विविध क्षेत्रांत प्रगती करण्यासाठी प्रोत्साहन दिले.

मान्यवरांनी आपल्या भाषणातून आप्पासाहेब कै. व्ही. आर. वाणी सरांच्या कार्याला उजाळा दिला. शिक्षण क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेली भूमिका याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनीही त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन शिक्षणासोबत सामाजिक व पर्यावरणीय जबाबदारी जपावी, असे आवाहन करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील देशमुख यांनी केले, तर नितीन बारी यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक सुनील माळी, मुख्याध्यापक अतुल गर्गे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

कै. व्ही. आर. वाणी सरांच्या स्मृती दिनानिमित्त आयोजित विविध स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आणि कौशल्यांना व्यासपीठ मिळाले. बक्षीस वितरणासोबतच स्वच्छता व प्लास्टिकमुक्त शाळेचा संकल्प करण्यात आल्याने कार्यक्रमाला सामाजिक आणि पर्यावरणपूरक संदेशाची जोड मिळाली.


Protected Content

Play sound