
धरणगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील पाळधी पोलिस दुरक्षेत्राच्या नव्याने उभारण्यात आलेल्या तीन मजली इमारतीचे भव्य लोकार्पण शनिवारी, १८ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. या उद्घाटन सोहळ्यास जिल्हाधिकारी रोहन घुगे, पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, विभागीय पोलीस अधिकारी अप्पासाहेब घोलप, धरणगाव पोलीस निरीक्षक अशोक पवार, सपोनी गणेश कंडारे आदी मान्यवर उपस्थित होते.
पाळधी पोलिस ठाण्याच्या नव्या इमारतीसाठी शासनाकडून ४ कोटी २३ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. अत्याधुनिक सोयी-सुविधांसह उभारण्यात आलेल्या या इमारतीत पोलिसांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आवश्यक असलेली सर्व यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षमपणे राखण्यासाठी अशा स्वरूपाची भौतिक सुविधा महत्त्वपूर्ण ठरते, असे मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
लोकार्पण प्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पाळधीसारख्या गावात आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण होणे हे प्रशासनाच्या दूरदृष्टीचे प्रतीक असल्याचे सांगितले. त्यांनी पोलिस विभागाच्या कार्यक्षमतेचे कौतुक करताना, जनतेच्या सेवेसाठी सज्ज राहण्याचे आवाहनही केले. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी प्रशासन आणि पोलिस यांच्यातील समन्वयामुळेच अशा प्रकल्पांना वेग मिळतो, असे सांगत पुढील काळातही अशीच यंत्रणा बळकट करण्याचे संकेत दिले.
या नवीन इमारतीमुळे पाळधी परिसरातील नागरिकांना अधिक चांगली सेवा मिळण्यास मदत होणार असून, पोलिसांच्या कामकाजातील अडचणी दूर होणार आहेत. स्थानिकांनीही या उपक्रमाचे स्वागत करत प्रशासनाचे आभार मानले.



