जीएमसीत बधिरीकरण शास्त्र विभागाच्या नूतन विभागाचे उद्घाटन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात बधिरीकरण शास्त्र (भूलशास्त्र) विभागातर्फे जीवन संजीवनी सप्ताह अंतर्गत बेसिक लाईफ सपोर्टचे प्रशिक्षण जनतेला ओपीडी इमारतीत देण्यात येत आहे. त्याची सुरुवात प्रभारी अधिष्ठाता डॉ. किशोर इंगोले यांच्या हस्ते सोमवारी १६ ऑक्टोबर रोजी करण्यात आली. तसेच, बधिरीकरण शास्त्र विभागाच्या नूतन विभागाची प्र. अधिष्ठाता डॉ. इंगोले यांनी फित कापून सुरुवात केली.

रुग्णालयामधील बाह्यरुग्ण विभागात जीवन संजीवनी सप्ताह (दि. १६ ते २१ ऑक्टोबर) हा जनजागृती कार्यक्रम घेण्यात येत आहे. सोमवारी सकाळी प्रभारी अधिष्ठाता डॉ. किशोर इंगोले, पदव्युत्तर अधिष्ठाता डॉ. मारुती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड, विभाग प्रमुख डॉ. सुरेखा चव्हाण उपस्थित होते. सुरुवातीला प्रस्तावनेतून डॉ. चव्हाण यांनी सप्ताहाविषयी माहिती दिली.

बधिरीकरण शास्त्र विभागातर्फे जीव रक्षकाचे प्रशिक्षण देणेसाठी रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागांमध्ये रोज सकाळी १० ते १ या वेळेमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. यामध्ये रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना बेसिक लाईफ सपोर्ट या विषयीचे प्रात्यक्षिक आणि प्रशिक्षण भूलतज्ञांद्वारे दररोज देण्यात येत आहे. साधारणपणे ५०० रुग्णांना आणि २०० कर्मचाऱ्यांना असे एकूण ७०० लोकांना जीव संरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात येण्याचे उद्दिष्ट आहे.

जनजागृती प्रशिक्षणकरिता विभागप्रमुख डॉ. सुरेखा चव्हाण ढमढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. राजेश सुभेदार, सहाय्यक प्राध्यापक डॉ. हर्षद महाजन, सहाय्यक प्राध्यापक डॉ. माधुरी पाटील, डॉ. वैभव सोळंके, डॉ. चेतन आद्रट, डॉ. अंजू पॉल, डॉ. प्रियंका लाडोले तसेच पदव्युत्तर विद्यार्थी आणि आंतरवासिता डॉक्टर्स हे परिश्रम घेत आहे.

जीवन संजीवनी सप्ताहनिमित्ताने बधिरीकरण शास्त्र विभागाची नवीन इमारतीमध्ये स्थापना होणार आहे. त्यासाठी विभागाची सुरुवात प्रभारी अधिष्ठाता डॉ. किशोर इंगोले यांच्या उपस्थितीत करण्यात आली. प्रसंगी डॉ. इंगोले यांनी, भूलशास्त्र विभागाच्या उपक्रमांचे कौतुक करीत रुग्णांना शस्त्रक्रियाकामी भूलशास्त्र विभाग महत्वाची भूमिका बजावत असते असे सांगितले.

यावेळी विविध विभागप्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी विभागातील स्टाफसह लघुलेखक दिलीप मोराणकर, गोपाल सोळंकी, साहेबराव कुडमेथे, ज्ञानेश्वर डहाके, जनसंपर्क सहायक विश्वजीत चौधरी, राकेश सोनार, अजय जाधव, प्रकाश पाटील आदींनी परिश्रम घेतले.

Protected Content