शॉर्टसर्कीटमुळे घराला आग; संसारोपयोगी वस्तू जळून खाक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील आसोदा येथे मध्यरात्री शॉर्टसर्कीट होऊन सत्तार हैदर खाटीक (रा. खाटीक वाडा) यांच्या घराला आग लागून घरातील पाच ते सहा हजार रुपये मूल्याच्या नोटा तसेच कपडे, धान्य, भांडे असा संपूर्ण संसारच आगीत जळून खाक झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील आसोदा येथे सत्तार हैदर खाटीक व त्यांच्या पत्नी असे दोन जण खाटीक वाड्यातील छोट्याशा घरात राहतात. मजुरी हेच त्यांचे उदरनि‌र्वाहाचे साधन. सोमवार १६ ऑक्टोबर रोजी रात्री हे दाम्पत्य झोपलेले असताना मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्कीट होऊन आग लागली. घरात धूर निघत असल्याचे लक्षात येताच हे दाम्पत्य घराबाहेर गेले. त्यावेळी क्षणात आगीने रौद्ररुप धारण केले व संपूर्ण घर आगीच्या भक्षस्थानी सापडले. या आगीत पाण्याची मोटार, धान्य, भांडे ‘पत्रे, फ्रिज, कुलर व चलनी नोटा खाक होऊन जवळपास दोन लाखांपर्यंत नुकसान झाले. सुदैवाने यात कोणाला इजा झाली नाही.
मंगळवारी १७ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता पंचनामा करण्यात आला. या कुटुंबाला शासनाकडून मदत मिळावी, अशी मागणी होत आहे. याप्रकरणी अद्याप पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.

Protected Content