जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रोटरी क्लब जळगाव ऑफ इलाईटच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा मायादेवीनगरातील रोटरी भवनात जल्लोषात झाला. या क्लबचे मावळते अध्यक्ष अजित महाजन यांनी नूतन अध्यक्ष ओमप्रकाश सिंग आणि मावळते सचिव अभिषेक निरखे यांनी नूतन सचिव संजय तापडिया यांच्याकडे नवीन वर्षाचा पदभार सोपविला.
हा पदग्रहण सोहळा रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ च्या माजी प्रांतपाल मंजू फडके (पुणे) आणि रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० चे सहप्रांतपाल उमंग मेहता यांच्या मुख्य उपस्थितीत झाला. रोटरी परिवारात चांगल्या विचारांच्या, क्रियाशील लोकांना सहभागी करुन रोटरी चळवळ बळकट करा. पदाधिकाऱ्यांनी महिला वर्ग, गरजू, उपेक्षित घटकांसाठी आणि ग्रामीण भागातही समर्पण भावनेतून सकारात्मक काम करणे आवश्यक आहे. चांगले काम करणाऱ्यांना प्रोत्साहन द्या, असे मार्गदर्शन मंजू फडके यांनी केले.
रोटरी परिवाराचे पोलिओ निर्मूलनासाठी जागतिक स्तरावर मोठे कार्य सुरू आहे. या क्लबच्या नवीन पदाधिकाऱ्यांनी देखील एकजुटीने सेवाभाव वाढवावा. आदिवासी भागात शैक्षणिक, आरोग्य आदी विषयांवर प्राधान्याने काम करणे आवश्यक आहे. गरजूंचे आधारस्तंभ व्हा, असे मार्गदर्शन उमंग मेहता यांनी व्यक्त केले. शैक्षिणक, आरोग्य, गरजू महिलांसाठी हिमोग्लोबिन तपासणी, शिवणकाम प्रशिक्षण, शिलाई मशीन वाटप, वृक्षारोपण, जलसंवर्धन, पर्यावरण आदी कामांना प्राधान्य देण्यात येईल. ‘ सेवा परमोधर्म ‘ नुसार आदर्श कामकाजावर भर राहील, अशी ग्वाही नूतन अध्यक्ष ओमप्रकाश सिंग यांनी दिली. सर्वांच्या सहकार्यातून स्तुत्य उपक्रम राबविण्यात येतील, असे आश्वासन नूतन सचिव संजय तापडिया यांनी दिले. प्रारंभी ईशस्तवन ऋषल सोमाणी, भगवान बारी यांनी केले. सूत्रसंचालन डॉ.वैजयंती पाध्ये यांनी केले. मान्यवरांचा परिचय डॉ. पंकज शहा यांनी करून दिला. संदीप झंवर यांनी आभार मानले.
या क्लबमध्ये मेडिकल डायरेक्टर लक्ष्मीकांत मणियार, डायरेक्टर ऑफ व्होकेशनल सर्व्हिस वैभव नेहते, डायरेक्टर न्यू जनरेशन प्रशांत वारके, डायरेक्टर मेंबरशिप डेव्हलपमेंट नितीन इंगळे, डायरेक्टर सर्व्हिस प्रोजेक्ट नॉन मेडिकल राजू बियाणी, डायरेक्टर पब्लिसिटी अँड पब्लिक इमेज डॉ.गोविंद मंत्री, डायरेक्टर टीआरएफ डॉ. मुर्तूजा अमरेलिवाला, डायरेक्टर क्लब अँडमिनिस्ट्रेशन डॉ.पंकज शहा, जॉइन सेक्रेटरी हरगोविंद मणियार, सर्जंट अँट आर्मस डॉ.विशाल जैन, आयपीपी डायरेक्टर इंटरनॅशनल सर्व्हिस अजित महाजन, प्रेसिडेंट इलेक्ट संदीप झंवर, ट्रेझरर धर्मेंद्र भय्या, डायरेक्टर सुमित मुथा, भैरवी गुजराथी, डॉ.शीतल भोसले हे पदाधिकारी आहेत.