रिव्हर राफ्टिंग करताना पर्यटकाचा मृत्यू

रायगड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | रायगडमध्ये रिव्हर राफ्टिंगनंतर एका पर्यटकाचा मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. रिव्हर राफ्टिंगचा आनंद घेऊन बाहेर पडत असताना एका पर्यटकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी समोर आली. रायगड जिल्ह्यातील रोहा येथे ही घटना घडली आहे. अभिजीत कुलकर्णी असे या मृत पर्यटकाचे नाव असून ते बांद्रा येथील विज वितरण कंपनीमध्ये मुख्य अभियंता म्हणून कार्यरत होते. अभिजीत कुलकर्णी हे आपल्या कुटुंबासह कोलाड येथे पावसाळी पर्यटनासाठी आले होते. शनिवारी त्यांनी कुंडलिका नदी पात्रात रिव्हर राफ्टींग केली आणि नदी पात्रातुन बाहेर पडत असताना ते खाली कोसळले. त्यांना लगेचच रोहा उपजिल्हा रुग्णालय येथे हलवण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी कुलकर्णी यांना मृत घोषित केले.

या प्रकरणी कोलाड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून कोलाड पोलीस अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, पावसाळ्यात पर्यटनस्थळी जात असताना काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. तसंच, लोणावळ्यातील भुशी डॅम दुर्घटनेनंतर पुणे, रायगड, ठाणे जिल्ह्यातील अनेक पर्यटन स्थळावर बंदी घालण्यात आली आहे. तरी देखील जीव धोक्यात घालून पर्यटक सहकुटुंब याठिकाणी जात आहेत.

दरम्यान रायगड जिल्ह्यातील पावसाळी पर्यटन स्थळांवर फिरायला येणार असाल तर सावधान. काही गडबड केलीत तर तुम्हाला कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. कारण जिल्ह्यातील पावसाळी पर्यटन स्थळांवर प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. माणगाव तालुक्यातील ताम्हाणी घाट, सिक्रेट पॉइंट, देवकूंड धबधबा इथं हे प्रतिबंधात्मक आदेश जारी झाले आहेत.

Protected Content