खामगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रोटरी क्लब खामगाव या संस्थेच्या नूतन कार्यकारणीचा पदग्रहण समारंभ नुकताच शहरातील अग्रसेन भवनात पार पडला.
सदर कार्यक्रम प्रमुख पाहुणे प्रांतपाल मोहन पालेशा (पुणे) आणिपूर्व प्रांतपाल डॉ आनंद झुंझुनूवाला यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. मावळते अध्यक्ष आलोक सकळकळे आणि मावळते मानद सचिव रितेश केडिया यांनी आपापला पदभार अनुक्रमे नवनियुक्त अध्यक्ष सुप्रसिद्ध उद्योगपती सुरेश पारिक आणि आनंद शर्मा यांना कॉलर व लेपल पिन देऊन सुपूर्द केला. तत्पूर्वी मावळते मानद सचिव रितेश केडिया यांनी वर्षभरात पार पाडलेल्या कार्याचा अहवाल उपस्थितांसमोर मांडला. मावळते अध्यक्ष आलोक सकळकळे यांनी त्यांना वर्षभरात आलेल्या चांगल्या अनुभवांचे कथन केले आणि क्लबचे सर्व सदस्य व आपल्या कुटुंबीयांविषयी आदर व्यक्त करून त्यांचे आभार मानले.
आपल्या प्रथम अध्यक्षीय भाषणात नवनियुक्त अध्यक्ष सुरेश पारिक यांनी रोटरीचा गौरवशाली वसा रोटरीच्या सर्व सदस्यांच्या सहकार्याने पुढे घेऊन जाण्याचा मनोदय व्यक्त केला. डॉ आनंद झुंझुनूवाला यांनीदेखील त्यांच्या कार्यकाळात सर्वांनी झोकून देऊन कामे करून त्यांची २०२२-२३ ची कारकीर्द यशस्वी ठरविल्याबद्दल सर्वांचे मन:पूर्वक आभार मानले. प्रमुख पाहुणे मोहन पालेशा (पुणे) यांनी खामगांव येथील रोटरी क्लबच्या सर्व सदस्यांमध्ये असलेल्या समर्पकतेबाबत चांगल्या भावना व्यक्त केल्या आणि दान करण्याचे महत्व विषद करून सढळ हाताने रोटरी फाउंडेशनला आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले. रोटरी क्लब खामगांवने मागील वर्षी रोटरी फाउंडेशनला सुमारे १७ लक्ष रुपयांची आर्थिक मदत केल्याबद्दल गौरवोद्गार काढले. क्लब पीआरओ व एडिटर राजेश मंत्री यांनी तयार केलेल्या क्लबच्या यावर्षीच्या प्रथम बुलेटीनचे विमोचन मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. बुलेटीनचे अवलोकन करून पाहुण्यांनी हा अंक म्हणजे रोटरी क्लब खामगांवचा जणू आरसाच होय आणि त्यात त्यांनी वर्षभर केलेल्या कार्याचे प्रतिबिंब दिसून येते असे प्रतिपादन करून समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाची सर्व ऑडिओ व्हिज्युअल तांत्रिक बाजू प्रसाद अग्रवाल, विशाल गांधी व विनीत लोडाया यांनी समर्थपणे सांभाळली.
या कार्यक्रमात दहावी आणि बारावीत खामगांव शहरातून प्रथम आलेल्या कु चाहत विजय लखवानी आणि कु सायली राजू देठे या विद्यार्थिनींचा रोख पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सुरेल संचालन करण चोपडा व सौ मोनल चोपडा या दाम्पत्यांनी केले आणि त्यांना सहायक म्हणून सुशांतराज घवाळकर यांनी कार्य पाहिले. आभार प्रदर्शन नवनियुक्त मानद सचिव आनंद शर्मा यांनी मानले. याप्रसंगी आमदार एडवोकेट आकाश फुंडकर यांच्यासहित शहरातील गणमान्य व्यक्ती व पत्रकार उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता स्वरूची भोजनाने झाली.
वर्षाची सुरुवात दोन धडाकेबाज कार्यक्रमांनी झाली. जलम्ब आणि माटरगांव येथे प्रकल्पप्रमुख देवेश भगत, सह-प्रकल्पप्रमुख राजीव शाह आणि संकेत धानुका यांनी आयोजित केलेल्या मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबीराला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला आणि सुमारे ७८ रुग्ण हे दमाणी आय केअर हॉस्पिटल अकोला यांचेद्वारे करण्यात येणा-या शस्त्रक्रियांसाठी पात्र ठरले.
तसेच अग्रसेन भवन येथे प्रकल्पप्रमुख विनय मोहनानी व सह-प्रकल्पप्रमुख मुकुंद मोटवानी यांचेद्वारे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात एकूण ७४ युनिट्स रक्त जमा झाले. या शिबिरात सिल्व्हरसिटी हॉस्पिटल खामगांव, श्री दत्ताजी भाले ब्लड बँक औरंगाबाद व डॉ सोनी यांची श्री सुवर्णकार ब्लड बँक खामगांव यांचे बहुमोल सहकार्य लाभले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व रोटरी सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.