पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांच्या पराभवामागे षडयंत्र – खडसेंचा पुनरुच्चार

khadse e1550572684596

बीड, वृत्तसंस्था | भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी पुन्हा एकदा भाजपला घरचा आहेर दिला आहे. भाजप नेत्यांच्या पराभवामागे पक्षातील लोकांचाच हात असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला आहे. पक्षातील लोकांनीच आमच्याविरुद्ध षडयंत्र केल्याच्या आरोपावर खडसे ठाम आहेत. मात्र भाजपवर कोणतीही नाराजी नाही, असेही खडसेंनी म्हटले आहे. एकनाथराव खडसे गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमासाठी सध्या परळीतील गोपीनाथगडावर उपस्थित आहेत.

 

जनता दलापासून भाजपची शेटजी-भटजींचा पक्ष अशी ओळख होती., मात्र गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, अण्णा डांगे, नितीन गडकरी अशा अनेक नेत्यांनी पक्षविस्ताराचे मोठे काम केले. पक्षाची छवी बदलण्याचा सातत्याने प्रयत्न केला. त्यानंतर शेटजी-भटजींचा पक्ष अशी ओळख असलेल्या पक्षाची ओळख बहुजन समाजाचा पक्ष अशी बनवण्यात त्यांना यश आले. हे सगळे करताना या नेत्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. मात्र या संघर्षानंतर भाजपला राज्यात चांगले दिवस आले. दुर्दैवाने गोपीनाथ मुंडे या चांगल्या दिवसांमध्ये आमच्यासोबत नाहीत, असेही खडसेंनी सांगितले.

पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांच्या पराभवामागे षडयंत्र असल्याचा आरोप खडसेंनी पुन्हा एकदा केला. मी निवडून येण्याची खात्री असताना मला पक्षाने मला तिकीट नाकारले तर रोहिणी खडसे इच्छूक नसताना त्यांना पक्षाने जबरदस्तीने तिकीट दिले. गोपीनाथ मुंडे यांनी हसत-खेळत राजकारण केले. आजच्या नेतृत्वात ते गुण दिसत नाहीत. मदत करण्याची भावना नेतृत्वात राहिली नाही, तर द्वेशाची, मत्सराची भावना आहे. ज्या लोकांना आम्ही विश्वासाने तयार केले, त्यांनी विश्वासघात केला, असा टोलाही खडसेंनी लगावला.

अडचणीतून मार्ग काढण्यासाठी गोपीनाथ मुंडे यांनी वेळोवेळी मदत केली. आजची राजकारणातील परिस्थिती पाहता मुंडेसाहेब आता सोबत असते तर ही वेळ आली नसती. सर्वात महत्त्वाचे गोपीनाथ मुंडेंनी पाठीत खंजिर खुपसण्याचे काम कधी केले नाही, समोरासमोर लढले, विश्वासघात केला नाही. मेहनत केलेल्या लोकांवर आज अन्याय होतोय आणि अपमानही केला जात आहे, अशी भावना खडसेंनी यावेळी व्यक्त केली.

Protected Content