पालघर हत्याकांडात एकही मुस्लिम आरोपी नाही ; गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती

मुंबई (वृत्तसंस्था) पालघरच्या घटनेत एकही मुस्लीम नव्हता. ही घटना घडत असताना ‘ओये बस’ म्हणजे आता थांबा ऐवजी शोएब असा विपर्यास करण्यात आला, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. तसेच एकजुटीने सामना करण्याचं सोडून काही लोक पालघरच्या घटनेचं जातीचं राजकारण करून मुंगेरीलाल के हसीन सपने पाहत असल्याचेही श्री.देशमुख म्हणाले.

 

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज ट्विटर लाइव्हवरून जनतेशी संवाद साधत पालघर आणि वाधवान प्रकरणावर भाष्य केले. “पालघरचा संपूर्ण तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला असून घटना झाल्यानंतर आठ तासात १०१ जणांना ताब्यात घेतलं. गुन्हेगार बाजूच्या जंगलात पळून गेले होते. तेथून त्यांना ताब्यात घेतले. त्या १०१ जणांची यादी आज जाहीर करणार आहे,” अशी माहिती अनिल देशमुख यांनी यावेळी दिली. तर गृहमंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या चुकीमुळे वाधवान कुटुंब महाबळेश्वरमध्ये पोहोचले होते. या वाधवाना कुटुंबाचा क्वॉरन्टाईन पीरियड आज दुपारी दोन वाजता संपत आहे. पोलीस दलातर्फे ईडी आणि सीबीआयला पत्र लिहून याबाबत माहिती दिली आहे. आपण त्यांना आपल्या ताब्यात घ्यावे ही विनंती केली आहे. आज दुपारी दोनपर्यंत सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी त्यांना घेऊन जावे. जोपर्यंत सीबीआयचे अधिकारी त्यांना घेऊन जात नाहीत तोपर्यंत हे वाधवान कुटुंब आमच्याच ताब्यात राहिल. गेल्या 15 दिवसांपासून त्यांना एका हायस्कूलमध्ये क्वॉरन्टाईन केले आहे. दुपारी दोनची वेळ संपल्यानंतर सीबीआयने त्यांना आपल्या ताब्यात घेऊन पुढील चौकशीचं काम करावे, असेही श्री.देशमुख यांनी सांगितले.

Protected Content