मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर शहरातील अवजड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महालक्ष्मी गॅस एजन्सीसमोरील बोदवड रोडवर एक भलामोठा कंटेनर थेट गटारात जाऊन अडकल्याची घटना घडली. रस्त्यावरून जाणाऱ्या पादचारी महिलांना वाचवण्याच्या प्रयत्नात कंटेनर गटारात अडकल्याने संभाव्य मोठी दुर्घटना टळली. मात्र, या घटनेमुळे पादचारी नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
मुक्ताईनगर शहरातून होणाऱ्या अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. रस्त्यांवर उडणारी धूळ, मोठ्या वाहनांची वर्दळ आणि अरुंद रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण यामुळे पादचाऱ्यांसाठी रस्त्यावरून चालणेही धोकादायक ठरत असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना अवजड वाहनांच्या वाहतुकीचा मोठा धोका निर्माण झाला आहे. महालक्ष्मी गॅस एजन्सीसमोरील घटनेत कंटेनर गटारात अडकल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, अशा प्रकारची घटना पुन्हा घडल्यास त्याचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आज कंटेनर गटारात अडकला म्हणून संभाव्य दुर्घटना टळली; परंतु उद्या याच ठिकाणी एखाद्या पादचारी महिलेचा, ज्येष्ठ नागरिकाचा किंवा अन्य नागरिकाचा अपघात झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार? नागरिकांना सुरक्षितपणे रस्त्यावरून चालण्याचा अधिकार नाही का? अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे पादचाऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण होत असेल, तर प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार, असे सवाल उपस्थित होत आहेत.

या पार्श्वभूमीवर नगरपंचायत, वाहतूक पोलीस आणि संबंधित प्रशासनाने तातडीने दखल घेण्याची गरज आहे. शहरातील अवजड वाहनांच्या वाहतुकीचे योग्य नियोजन करणे, आवश्यकतेनुसार पर्यायी मार्ग निश्चित करणे, धुळीवर नियंत्रण मिळवणे तसेच पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे. केवळ अपघात घडल्यानंतर प्रशासनाने हालचाल करण्यापेक्षा संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी आधीच प्रतिबंधात्मक पावले उचलणे आवश्यक आहे. महालक्ष्मी गॅस एजन्सीसमोरील बोदवड रोडवरील घटनेनंतर तरी अवजड वाहतुकीवर कायमस्वरूपी नियंत्रण आणले जाणार का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.



