Home धर्म-समाज चुंचाळे येथे ३० ऑक्टोबरपासून संगीतमय श्रीमद् देवी भागवत कथेचे भव्य आयोजन ;...

चुंचाळे येथे ३० ऑक्टोबरपासून संगीतमय श्रीमद् देवी भागवत कथेचे भव्य आयोजन ; सजीव देखाव्यांचीही होणार आकर्षक प्रस्तुती

0
11

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील चुंचाळे येथे भक्तिमय वातावरणात भव्य दिव्य संगीतमय श्रीमद् देवी भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. श्री समर्थ सुकनाथ बाबा यांची तपोभूमी, श्री समर्थ रघुनाथ बाबा यांची जन्मभूमी आणि श्री समर्थ वासुदेव बाबा यांच्या कर्मभूमीत हा धार्मिक सोहळा ३० ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत पार पडणार आहे. राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. गजानन महाराज धानोरकर यांच्या प्रेरणेने तसेच चुंचाळे ग्रामस्थांच्या सहकार्याने आयोजित या सप्ताहात देवी भागवत कथेचे निरूपण, हरिपाठ, काकडा आरती, दिंडी सोहळा आणि महाप्रसाद अशा विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. यासोबतच सजीव देखाव्यांचेही सादरीकरण करण्यात येणार असल्याने भाविकांसाठी हा सोहळा विशेष आकर्षण ठरणार आहे.

या धार्मिक सप्ताहादरम्यान दररोज पहाटे ५ ते ६ या वेळेत काकडा आरती होणार असून, सायंकाळी ६ ते ७ या वेळेत हरिपाठाचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री ८ ते ११ या वेळेत संगीतमय श्रीमद् देवी भागवत कथेचे निरूपण होणार आहे. राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. गजानन महाराज धानोरकर (वाल्मीक आश्रम, चिंचखेडा, ता. जामनेर) यांच्या अमृतवाणीतून भाविकांना देवी भागवत कथेचे श्रवण करण्याची संधी मिळणार आहे.

कथावाचनाच्या कार्यक्रमाला संगीताची सुरेल साथ लाभणार आहे. गायनाचार्य समाधान महाराज धानोरकर, दीपक महाराज सतखेडा, मृदुंगाचार्य पियुष महाराज धानोरकर, तबलावादक शुभम महाराज मुक्ताईनगर आणि ऑर्गनवादक मुकुंद महाराज खेरडा, मलकापूर हे साथसंगत करणार आहेत. विविध वाद्यांच्या सुरेल संगमातून कथा आणि कीर्तनाचा भक्तिरस भाविकांना अनुभवता येणार आहे. या सप्ताहाची सांगता ६ नोव्हेंबर २०२६ रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी होणार आहे. शुक्रवारी दुपारी १२ ते ४ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर सायंकाळी ४ ते ७ या वेळेत भव्य दिंडी सोहळा पार पडणार असून, राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. गजानन महाराज धानोरकर यांचे काल्याचे कीर्तनही होणार आहे.


Protected Content

Play sound