जळगाव, प्रतिनिधी | आपल्या देशात चलन निर्मिती आणि चलन बंदीचा अधिकार केंद्र सरकार आणि रिझर्व बँक यांच्या हाती आहे. असे असले तरी अनेकदा नागरिकच स्वयंस्फूर्तीने चलनबंदी लागू करताना दिसतात. या बेकायदेशीर चलन बंदीमुळे कायद्याचे पालन करणाऱ्या सुज्ञ नागरिकांना बऱ्याचदा त्याचा मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो.
सध्या देशात २५ पैशांचे नाणे आणि त्यापेक्षा कमी किमतीची नाणी सरकारने अधिकृतपणे बंद केली आहेत. पण आज बाजारातली वास्तव परिस्थिती बघितली तर ५० पैशांची नाणी, एक, दोन व पाच रुपयांच्या नोटा स्वीकारणेच लोकांनी बंद केले आहे. अशाचप्रकारे काही दिवसांपूर्वी १० रुपयांची नाणी स्वीकारणे अचानक बंद झाले होते. त्यातही काही प्रकारची नाणी चलनात होती तर काही विशिष्ट नाणी बंद झाल्याची अफवा पसरली होती. काही काळानंतर पुन्हा सगळी नाणी स्वीकारली जाऊ लागली. बँकांमधून मात्र अशाप्रकारे नाणी बंद झाल्याला कधीच दुजोरा मिळाला नाही.
नाणी बंद झाल्याची अफवा कोण पसरवतो, त्यावर सगळेजण कसा ठाम विश्वास ठेवतात ? हे काही मुद्दे आश्चर्यकारक आणि डोकं चक्रावणारे आहेत. पण वेळोवेळी समाजात अशाप्रकारे नाणे बंदीच्या अफवा पसरत असतात, हे मात्र सत्य आहे.