नूतन मराठा महाविद्यालयात ‘कर्तृत्ववान महिलांची यशोगाथा’ या व्याख्यानमालेचे आयोजन

जळगाव, प्रतिनिधी | नूतन मराठा महाविद्यालय आयोजित कर्तृत्ववान महिलांची यशोगाथा व्याख्यानमालेच्या पाचव्या दिवशी झाशीची राणी लक्ष्मीबाई आणि ताराबाई शिंदे यांच्या स्मृतींना प्रमुख वक्त्या प्रा तेजस्वीनी पाटील आणि भाग्यश्री पाटील यांनी उजाळा दिला.

 

व्याख्यानमालेचं पाचव़ं पुष्प गुंफताना, मै अपनी झाशी नही दुंगी! हर हर महादेव अशी गर्जना करत आपल्या नावाप्रमाणेच तेज तर्रार सुरुवात करणा-या तेजस्विनी पाटील यांनी प्रेक्षकांना झाशीच्या राणीचं हुबेहूब दर्शन घडवलं.. एका हातात तलवार,दुसऱ्या हातात ढाल अन् पाठीशी आपलं ईवलंसं बाळ घेऊन त्या व्यासपीठावर आपल्या तेजस्वी नजरेणं, निखाऱ्याप्रमाणे शब्दफेक करीत होत्या, जणू काही आपण त्याच काळात वावरत आहोत की काय असाच भास सर्वत्र होत होता.
व्याख्यानातील दुसऱ्या वक्त्या भाग्यश्री पाटील यांनी जागतीक किर्तीच्या स्त्रीवादी लेखिका ताराबाई शिंदे यांच्या “स्री पुरुष तुलना” या जागतीक निबंध ग्रंथाच्या आधारे ताराबाईं शिंदे यांच्या स्मृतींना उजाळा दिला. जगातील कोणत्याही धर्मांनी, त्या त्या धर्मातील पुराणांनी, धर्म ग्रंथांनी, साहित्यिकांनी, विचारवंतांनी जर आईला श्रेष्ठत्वाचा दर्जा दिला असेल, तीला देवत्व प्रदान केलं असेल तर, मग त्याच धर्मातील लोकांनी बाईला म्हणजे स्रीयांना दुय्यम स्थान द्यायचं काय कारण? असा प्रश्न प्रश्न उपस्थित करत महिलांचे दुर्गूण चव्हाट्यावर आणले जातात मग पुरुषांचे अवगूण का झाकले जातात? असे आणि या सारखे अनेक प्रश्न उपस्थित करत प्रा भाग्यश्री पाटील यांनी ताराबाई शिंदे यांचा जीवनपट उलगडला. अध्यक्षीय भाषणात उपप्राचार्य डॉ. एन. जे. पाटील यांनी दोघं व्याख्यातांच्या विचारांवर समाजकारण आणि राजकारण यातील दोन कर्तृत्ववान महिलांना आपण योग्य तो सन्मान दिला आहे त्यांचा यथोचित गौरव केला आहे असे समर्पक मत मांडले. सुत्रसंचलन प्रा. वैशाली सपकाळे यांनी तर आभार प्रा. मनिषा पारधी यांनी मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख, उपप्राचार्य डॉ. एन. जे. पाटील, उपप्राचार्य प्रा. राजेंद्र देशमुख, उपप्राचार्य प्रा. आर. बी. देशमुख तसेच सर्व शाखेतील विभाग प्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि बहूसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

Protected Content