Home Cities अमळनेर खोटं बोला पण रेटून बोला’ ; उपनगराध्यक्ष प्रशांत निकम यांच्यावर जितेंद्र ठाकूरांचा...

खोटं बोला पण रेटून बोला’ ; उपनगराध्यक्ष प्रशांत निकम यांच्यावर जितेंद्र ठाकूरांचा पलटवार 

0
9


अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर नगरपालिकेच्या जलकुंभ स्वच्छतेच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. उपनगराध्यक्ष प्रशांत निकम यांनी जलकुंभांची गेल्या २२ ते २४ वर्षांपासून स्वच्छता झालेली नसल्याचा दावा केल्यानंतर विरोधी गटाचे नेते जितेंद्र ठाकूर यांनी हा दावा फेटाळून लावत निकम यांच्यावर जोरदार टीका केली आहे. “खोटं बोला पण रेटून बोला”, असा टोला लगावत त्यांनी उपनगराध्यक्ष हे केवळ प्रसिद्धीसाठी स्टंट करत असल्याचा आरोप केला.

जितेंद्र ठाकूर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहर विकास आघाडीने शहरातील दूषित आणि अनियमित पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर २२ जून रोजी मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. मात्र प्रशासनाच्या विनंतीनंतर आणि शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा विचार करून मोर्चा स्थगित ठेवत चर्चेला प्राधान्य देण्यात आले. त्यानंतर उपनगराध्यक्ष प्रशांत निकम यांनी जलकुंभ स्वच्छतेबाबत केलेले वक्तव्य वस्तुस्थितीला धरून नसून जनतेची दिशाभूल करणारे असल्याचे ठाकूर यांनी म्हटले आहे. अमळनेर शहरात एकूण सात पाण्याच्या टाक्या असून त्यापैकी झामी चौक येथील टाकी सध्या पाडण्यात आली आहे. कोर्टामागील आणि लालबाग परिसरातील तीन जलकुंभ सन १९९८ मध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून नगरपालिकेकडे हस्तांतरित झाल्या होत्या. या जलकुंभांची सन २०११ ते २०१४ या कालावधीत नगराध्यक्षा जयश्रीताई अनिल पाटील यांच्या कार्यकाळात तत्कालीन मुख्याधिकारी सोमनाथ शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली व्यापक स्वच्छता मोहीम राबविण्यात आल्याचा दावा ठाकूर यांनी केला आहे.

या स्वच्छता मोहिमेदरम्यान जलकुंभांमधून मोठ्या प्रमाणात गाळ काढण्यात आला होता. त्यामुळे गेल्या २४ वर्षांपासून टाक्यांची स्वच्छता झालेली नाही, हा उपनगराध्यक्षांचा दावा पूर्णपणे चुकीचा असल्याचे ठाकूर यांनी म्हटले आहे. याच कार्यकाळात ढेकूरोडवरील लक्ष्मीनगर, पैलाड, मुंदडानगर, रामवाडी आणि तांबेपुरा परिसरातील पाच नवीन जलकुंभांचे बांधकाम पूर्ण झाले होते. या जलकुंभांचे लोकार्पण १ मार्च २०१४ रोजी तत्कालीन खासदार ए. टी. पाटील, नगराध्यक्षा जयश्रीताई पाटील आणि आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत झाल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच प्रशासकीय काळात तांबेपुरा येथील पाचवी टाकी उभारण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

शहर विकास आघाडीने पाणीप्रश्नावर आंदोलनाचा इशारा दिल्यानंतरच उपनगराध्यक्षांना जलकुंभांची आठवण झाली का, असा सवाल जितेंद्र ठाकूर यांनी उपस्थित केला. गेल्या सहा महिन्यांपासून सत्ता हातात असताना शहरातील पाणीपुरवठ्याच्या समस्येवर काय उपाययोजना करण्यात आल्या, याचे उत्तर जनतेला द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर टाकीत उतरून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही ठाकूर यांनी केला. सन २०१४ नंतर विविध नगराध्यक्षांच्या आणि प्रशासकीय कार्यकाळात जलकुंभांची स्वच्छता का झाली नाही, याबाबतही प्रशांत निकम यांनी आत्मपरीक्षण करावे, असे आवाहन त्यांनी केले.

माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या कार्यकाळातील माजी नगराध्यक्षा भारती चौधरी, माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या कार्यकाळातील नगराध्यक्षा पुष्पलता पाटील तसेच प्रशासकीय काळाचा उल्लेख करत ठाकूर यांनी केवळ निवडक व्यक्तींवर आरोप करण्याऐवजी शहराच्या विकासासाठी सकारात्मक भूमिका घेण्याचा सल्ला दिला. प्रशांत निकम यांनी जनतेची दिशाभूल न करता शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर ठोस काम करावे. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित विषयात गंभीरता दाखवावी आणि नैतिक जबाबदारीची जाणीव असेल तर पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी जितेंद्र ठाकूर यांनी निवेदनातून केली आहे.


Protected Content

Play sound