नवीदिल्ली, वृत्तसंस्था | महाराष्ट्रात सत्तेची समीकरणे रोज मांडली जात आहेत. त्याबाबत अनेकजण बोलत आहेत, मी त्याबाबत काहीही बोलणार नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रात नवे सरकार स्थापन होईल, याची खात्री बाळगा असेही फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले. दिल्लीमध्ये जाऊन आज फडणवीस यांनी अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. विशेष बाब म्हणजे युती शब्दाचा प्रयोग त्यांनी केला नाही.
२४ ऑक्टोबर रोजी विधानसभेचे निवडणूक निकाल लागले. शिवसेनेला ५६ तर भाजपाला १०५ जागा मिळाल्या. या सगळ्या सत्ता समीकरणांबाबत उलटसुलट चर्चा केली जात आहे. शिवसेनेने सत्तेत अर्धा वाटा मागितला असून मुख्यमंत्रीपदही अडीच-अडीच वर्षे वाटून घ्या, असे म्हटले आहे. यामुळे महाराष्ट्रात सत्ता स्थापनेत अडचणी येत आहेत. महाराष्ट्राच मुख्यमंत्री कोण होणार? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सरकार स्थापनेच्याही विविध चर्चा सुरु आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत हे गेल्या काही दिवसांपासून रोज पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, असे सांगत आहेत. रविवारी तर त्यांनी आमच्याकडे १७० आमदारांचे पाठबळ असल्याचेही सांगितले.