भाजपमध्ये जाणार नाही- सचिन पायलट

नवी दिल्ली वृत्तसंस्था । आपण गेहलोत यांच्यावर नाराज असलो तरी भाजपमध्ये जाणार नसल्याची माहिती राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी दिली आहे. तर दुसरीकडे अशोक गेहलोत यांनी बोलावलेल्या बैठकीत पक्षाचे बहुसंख्य आमदार उपस्थित असल्याचे दिसून आले आहे.

राजस्थानातील राजकीय पेचाच्या पार्श्‍वभूमिवर, आजच्या घडामोडी अतिशय महत्वाच्या ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी सहकारी आमदारांसह दिल्ली गाठली असून गेहलोत यांच्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पहाटे अडीच वाजता पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस सरकारकडे १०९ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला. याप्रसंगी राजस्थानचे प्रभारी अविनाश पांडे यांनी काँग्रेस सरकारला कोणताही धोका नसल्याचा दावा केला. राजस्थान सरकार तसंच सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वावर विश्‍वास असल्याच्या पत्रावर स्वाक्षरी केली असल्याचे याप्रसंगी सांगण्यात आले होते.

दरम्यान, आज एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सचिन पायलट यांनी आपण गेहलोत यांच्यावर नाराज असलो तरी भाजपमध्ये जाणार असल्याच्या बातम्या तथ्यहीन आहेत. तर दुसरीकडे अशोक गेहलोत यांनी बोलावलेल्या बैठकीत पक्षाचे ९७ आमदार उपस्थित असल्याचे समोर आल्याने सचिन पायलट यांचे बंड फसणार की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे.

राजस्थान विधानसभेत काँग्रेस सरकारचे १०७ एवढे संख्याबळ असून त्यांना १३ अपक्षांसह भारतीय ट्रायबल पार्टीच्या दोन आणि राष्ट्रीय लोक दलाच्या एका आमदाराचा पाठिंबा आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या दोन आमदारांनी काँग्रेसला बाहेरून पाठिंबा दिला आहे. संख्याबळाचा विचार केला असता पायलट यांच्या सोबत ३० आमदारांनी राजीनामा दिला तरी काँग्रेस सरकारला धोका नसेल असे जाणकारांचे मत आहे.

Protected Content