मुक्ताईनगर प्रतिनिधी । आगामी निवडणुकीत आपण स्वत: मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून दावेदार असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांनी आज केले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून एकनाथराव खडसे यांचे तिकिट कापून त्यांच्या कन्या तथा जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे-खेवलकर यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे. सोशल मीडियात यावरून मोठ्या प्रमाणात चर्चादेखील झडत आहेत. या पार्श्वभूमिवर, आज एकनाथराव खडसे यांनी या प्रकरणी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली. येथे पत्रकारांशी बोलतांना त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपण स्वत:च मुक्ताईनगरातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असून पक्षाने तिकिट दिल्यास नक्की लढणार असल्याचे स्पष्ट केले.
याप्रसंगी एकनाथराव खडसे यांनी पक्षातील आयारामांवरही टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, पक्षाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजपमध्ये सुरू असणार्या इनकमींगवर केलेल्या मतांशी आपण सहमत आहोत. पक्षवाढीसाठी अन्य पक्षांमधील नेते भाजपमध्ये येणे आवश्यक असले तरी येणार्या नेत्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत का ? अथवा त्यांनी आमच्यावर आधी आरोप केले आहेत का ? याची खातरजमा करणे गरजेचे आहे. यामुळे आयारामांच्या निष्ठा तपासून पाहण्याची मागणीदेखील खडसे यांनी याप्रसंगी केली.