मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन यांनी रावेरवरून जामनेरला जातांना थेट येथील प्रवर्तन चौकातील हॉटेल समोरच आ. चंद्रकांत पाटील व आ. संजय सावकारे यांच्यासोबत चहाचा आस्वाद घेत गप्पा मारल्या.
काल रावेर येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने खासदार रक्षाताई खडसे यांनी दिव्यांगांना साहित्य वाटपाचा कार्यक्रम घेतला होता. या कार्यक्रमाला हजेरी लाऊन राज्याचे ग्रामविकास व पर्यटन मंत्री ना. गिरीश महाजन हे मुक्ताईनगर,बोदवड मार्गाने जामनेर येथे गेले. यात त्यांनी आ. चंद्रकांत पाटील यांना कॉल करून भेटण्याचे ठरविले. यानंतर आमदार पाटील हे आपल्या सहकार्यांसह प्रवर्तन चौकातील उपहागृहाच्या समोर थांबले.
काही क्षणात ना. गिरीश महाजन यांचा ताफा प्रवर्तन चौकात आला. त्यांच्या सोबत भुसावळचे आमदार संजय सावकारे हे देखील होते. या मान्यवरांचे आमदार चंद्रकांत पाटील आणि त्यांच्या सहकार्यांचे स्वागत केले. यानंतर चौकातच या तिन्ही मान्यवरांमध्ये चर्चा रंगल्या. यात प्रामुख्याने तालुक्यातील विकासकामांबाबत आ. चंद्रकांत पाटील यांनी काही मागण्यांबाबत ना. गिरीश महाजन यांच्याशी चर्चा केली.
दरम्यान, मंत्र्यांसह दोन आमदार भर चौकात हॉटेल समोर बसून चहाचा आस्वाद घेत असल्याचे पाहून येथे मोठी गर्दी जमली. याप्रसंगी शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.