भुसावळ, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | राज्यात हनुमान चालीसा, भोंगा, राजकीय सभावर सभा यात एकमेकावर टीका असे सुरु आहे. कधी उद्धव ठाकरें, राज ठाकरें, नारायण राणें, देवेंद्र फडणवीसांची भाषणे होत आहेत. मी कुणाच्या भाषणावर टीका-टिप्पणी करणार नाही. पण महाराष्ट्राच्या राजकारणात असे एवढ्या खालच्या स्तरावरचे राजकारण आजवर नाही पाहिले, अशी खंत माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी भुसावळ येथे व्यक्त केली.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात हनुमान चालीसा, मशिदींवरील भोंगे, मनसे-शिवसेनेच्या सभा यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघालेले असून गढूळ वातावरण निर्माण झालेले आहे. जाती, धर्मात दरी निर्माण केली जात आहे. एकमेकांवर टिका-टिप्पणी करीत हा बोलला की, एकमेकांना अगदी खालच्या स्तरावर टीका-टिप्पणी सुरू आहे. गेल्या ४० वर्षांत मी असे काही अनुभवलेले नाही. मात्र यातून राज्यातील महत्त्वाच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष होत असून सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर तीव्र आणि खोचक शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी नापसंती व्यक्त केली. भुसावळमध्ये एका कार्यक्रमासाठी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी उपस्थिती लावली होती. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.