पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राज्यात घडत असलेल्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर गेल्या १५ दिवसांपासून बाहेर असलेले पाचोरा भडगाव नगरीचे आमदार किशोर पाटील यांचे आपल्या मतदार संघात आगमन झाले आहे. यावेळी नागरिकांनी रॅली काढून त्यांचे स्वागत केले.
पाचोरा येथे आल्यावर शिवसैनिकांशी हितगुज करतांना ते म्हणाले, “स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना नेते आदित्य ठाकरे या ठाकरे कुटुंबियांमुळेच स्व. आर. ओ. (तात्या) पाटील यांच्यानंतर मला सतत दोन वेळा आमदारकी मिळाली असल्याने मी ठाकरे कुटुंबियांचे मनापासून आभारी आहे.
मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्या मतदारसंघाच्या विकासासाठी गेल्या २ वर्षात ७० ते ८० कोटींचा निधी दिला. त्यांनी माझ्या घरी ५ वेळा येऊन माझी भेट घेत माझ्या दुःख सुखात सामील झाले व भविष्यातही ते मुख्यमंत्री झाल्यामुळे मला मतदारसंघाचा चांगला विकास करता येईल. महाविकास आघाडीमुळे शिवसेनेचे खच्चीकरण होत असल्याने आम्ही स्वर्गीय बाळासाहेबांची शिवसेना वाचविण्यासाठी ४० आमदार बाहेर पडलो. मी आजही शिवसैनिक असून मतदारसंघाच्या विकासासाठी व एकनाथ शिंदे यांचे माझे सर्वसूत संबंध असल्याने व त्यांचा शिष्यत्व पत्कारल्यामुळे जरी ३८ आमदार बाहेर पडले नसते तरीही मी एकटा एकनाथ शिंदेंसोबत बाहेर पडलो असतो. असे उद्गार आमदार किशोर पाटील यांनी काढले.
राज्यात गेल्या ५ वर्षांपूर्वी भाजपा – सेनेची युतीही होती. मात्र त्यांचे व आमचे अनेकदा वाद होत असले तरी ती विचारांची लढाई होती. गेल्या अडीच वर्षात आम्ही राष्ट्रवादी व काँग्रेस सोबत महाविकास आघाडी केल्यानंतर तब्बल दोन वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेना पक्ष नेस्तनाबूत करून राष्ट्रवादी पक्ष वाढविण्याचे धोरणे आखली. आम्हाला कमी निधी देऊन त्यांच्या पक्षातील मंत्री व आमदारांना आणि काहीच मतांनी निवडणूक हरलेल्या उमेदवारांना मोठे करण्याचे काम केले.
गेल्या २ वर्षांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह अनेक कट्टर शिवसैनिकांच्या आमदार, खासदारांनी उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांचे जवळ जाऊन शिवसेना संपत असल्याबाबत गाऱ्हाणे मांडले. गेल्या २ वर्षात झालेल्या निवडणुकांमध्ये शिवसेना पक्ष चौथ्या क्रमांकावर गेल्याची जाणीव करून दिली. सुरवातीला केवळ २० आमदार हे एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले होते. उर्वरित २० आमदारांनी व काही मंत्र्यांनी पक्षप्रमुखांना ही बाब लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी काही एक ऐकले नाही यामुळे नऊ मंत्र्यांसह ४० आमदारांचा उद्रेक झाल्याने ते शिंदे गटात सामील झाले.
ठाकरे कुटुंबियांपासून दूर जात असल्याने आम्हाला खूप यातनाही होत आहेत. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीची शिवसेना संपविण्याची चाल ओळखून शिवसेना वाचविण्यासाठी एकत्रित आले. एकनाथ शिंदे हुशार, चालक असल्याने ते राज्याचा चांगल्या प्रकारे विकास करतील याची खात्री असल्याने आम्ही त्यांच्यासोबत गेल्याचा आनंदही झाला आहे.
आम्ही शिवसैनिकच असून शिवसेनेसाठी व मतदारसंघाच्या विकासासाठी हे पाऊल उचलत असल्याने पाचोरा मतदारसंघातील नागरिकांनी माझ्या समर्थनार्थ मी एक साधा फोनही न करता ज्या दिवशी राज्यात सर्वात मोठी अशी रॅली काढली त्यावेळी मी तणावमुक्त झाल्याचे उपस्थित शिवसैनिकांना सांगितले.
राज्यसभा व २० तारखेला विधानपरिषदेची निवडणूक आटोपल्यानंतर मी घरी यायला निघालो होतो. ठाणे सोडल्यानंतर मला एकनाथ शिंदे यांचा फोन आल्यानंतर त्यांनी परत मुंबई येथे येण्याचा आदेश दिला. त्यांचा आदेश माझ्यासाठी गुरुसमान असल्याने मी कोणताही विचार न करता माघारी फिरलो व ज्या दिवशी आम्ही २० आमदार वाहनात बसलो त्यावेळी मला कुठे जायचंय ? आणि का जायचं आहे ? याबाबत किंचितही माहिती नव्हती. मात्र गुजरात राज्याची सीमा पार झाल्यानंतर मला कळले की, आपण गुजरात येथे शिंदे गटात सामील होण्यासाठी जात आहे. मी एकनाथ शिंदे यांचे शिष्यत्व पत्कारलेले असल्यामुळे त्यांना या प्रकाराबाबत एक शब्दानेही विचारले नाही.”
पाचोरा शहरात रॅली –
आमदार किशोर पाटील हे १५ दिवसांनंतर पाचोरा येथे आल्याने शिवसेना कार्यालयात भेट देऊन त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. यावेळी भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीत उद्योजक मुकुंद बिल्दिकर, जिल्हापरिषद सदस्य पदमसिंग पाटील, तालुका प्रमुख शरद पाटील, शहर प्रमुख किशोर बारावकर, माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, बाजार समितीचे माजी संचालक शिवदास पाटील, अनिल पाटील, वसंत वाघ, पंढरीनाथ पाटील, रमेश बापूराव पाटील, भडगाव चे जि. प. सदस्य संजय पाटील (भुरा अप्पा), माजी सदस्य विकास पाटील, माजी सभापती राजेंद्र पाटील, युवराज पाटील, डॉ. भरत पाटील, रहेमान तडवी, बापू हटकर, बंडू चौधरी, हिम्मतराव पाटील, अशोक बडगुजर, पतींग पाटील, शरद बाविस्कर सह मोठया संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. अनेकांनी आमदार किशोर पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.