ममता बॅनर्जींच्या सहकार्याची वेगळी चूल ; स्वतंत्र पक्षाची स्थापना

कोलकाता: वृत्तसंस्था । . ममता बॅनर्जी यांचे सहकारी आणि सिंगूर, नंदिग्राम आंदोलनात महत्त्वाची भूमिका निभावणारे फुरफुरा शरीफ दर्ग्याचे संस्थापक पीरजादा अब्बास सिद्दीकी यांनी नव्या पक्षाची स्थापना केली आहे. ‘इंडियन सेक्युलर फ्रंट’ असं सिद्दीकी यांच्या नव्या पक्षाचे नाव आहे.

पीरजादा अब्बास सिद्दीकी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन इंडियन सेक्युलर फ्रंटची स्थापनेचि घोषणा केली आहे. हा पक्ष राज्यात २९४ जागा लढवणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. सिद्दीकी यांच्या या घोषणेमुळे ममता बॅनर्जी यांच्यासमोरच्या अडचणीत वाढ झाल्याचं सांगितलं जात आहे.

सिद्दीकी हे ममता बॅनर्जी यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. सिंगूर आणि नंदीग्राम आंदोलनातही त्यांचं महत्त्वपूर्ण योगदान राहिलं आहे. पक्ष स्थापन करण्यापूर्वी सिद्दीकी यांनी एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांची भेट घेतली होती. गेल्या काही महिन्यांपासून सिद्दीकी यांचं ममता बॅनर्जी यांच्याशी बिनसल्याने त्यांनी ममता सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. त्यातच त्यांनी आज नवा पक्ष स्थापन करून ममता बॅनर्जींना मोठा झटका दिला आहे.

पश्चिम बंगालमध्ये 31 टक्के मुस्लिम मतदार आहेत. हा मुस्लिम मतदार टीएमसी आणि डाव्यांचा जनाधार आहे. मात्र, यंदाच्या निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये एमआयएमसह सिद्दीकी यांच्या पक्षानेही उडी घेतल्याने मुस्लिम मतांची विभागणी होऊन त्याचा भाजपलाच फायदा होणार असल्याचं राजकीय निरीक्षकांनी सांगितलं.

ममता बॅनर्जी यांनी मुस्लिमांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करून सिद्दीकी यांनी त्यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. पश्चिम बंगालच्या सुमारे १०० मतदारसंघात सिद्दीकी यांचा प्रभाव आहे. आता तेच निवडणूक मैदानात उतरल्याने ममता बॅनर्जींना किमान ४० ते ६० ठिकाणी नुकसान होऊ शकतं, असं राजकीय निरीक्षक सांगत आहेत.

Protected Content