पक्ष आणि चिन्ह गेले म्हणून अस्तित्व संपत नाही – शरद पवार

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह हातून गेल्यानंतर शरद पवार आज पहिल्यांदाच बारामतीमध्ये आहेत. यावेळी त्यांनी पक्ष आणि चिन्ह दुसऱ्याला दिलं म्हणून अस्तित्व संपत नाही असे म्हणत कार्यकर्त्यांना धीर देत नव्याने लढण्याची उमेद दिली. तसेच माझ्या वयाची चिंता करू नका, असे सांगत त्यांनी विरोधकांना टोलाही लगावला.

शरद पवार म्हणले, ”राजकारणात पक्ष उभे राहतात, काही पक्ष सोडून जातात. नवे येतात, असं होत असतं. एखादी व्यक्ती गेली म्हणजे संपूर्ण पक्ष गेला, असं नाही. चिन्हाची काळजी करायची नसते. चिन्ह काढून घेतलं म्हणजे संघटनेच अस्तित्व संपेल अस कधी होत नसतं. सामान्य लोकांशी संपर्क ठेवला पाहिजे”,असा सल्ला त्यांनी दिला. तसेच मी आत्तापर्यंत १४ निवडणुका लढलो त्यातल्या पाच निवडणुकांमध्ये चिन्हं वेगवेगळी होती असेही त्यांनी नमूद केले.

यावेळी त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. ”ज्याने पक्ष स्थापन केला त्याचा पक्षच काढून दुसऱ्याला दिला. नुसता पक्षच दिला नाही तर चिन्हही देऊन टाकलं. ठीक आहे, हा निर्णय कायद्याला धरुन आहे असं वाटत नाही. त्यामुळे आम्ही सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याचा निकाल नीट लागेल अशी अपेक्षा आहे.

दरम्यान, आधी निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवारांकडे सोपवलं. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल दोन दिवसांपूर्वीच समोर आला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसमोर काही महिने याप्रकरणी सुनावणी झाली. नार्वेकर यांनी दोन्ही गटांकडून सादर करण्यात आलेले पुरावे, दस्तावेज तपासले. तसेच दोन्ही गटांमधील नेत्यांची उलटतपसाणी करून अखेर याप्रकरणाचा निकाल सुनावला आहे. नार्वेकर यांनी शरद पवार गटाने अजित पवार गटातील आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी दाखल केलेल्या सर्व याचिका फेटाळल्या आहेत. तसेच अजित पवार गटातील आमदारांना पात्र ठरवलं आहे.,

Protected Content