दिव्यांग तपासणी संदर्भात प्रवर्तन संस्थेची पथनाट्याद्वारे जनजागृती

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बोदवड येथील प्रवर्तन संस्थेने येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दिव्यांग मंडळ येथे आज सकाळी जनजागृती करीत पथनाट्य सादर केले.

“ऐका हो ऐका… दिव्यांग तपासणीसाठी कोणाला पैसे देऊ नका. सरकारी दवाखान्यात या, येथेच सुयोग्य कार्यवाही होईल हो…” अशा शब्दात पथनाट्याच्या माध्यमातून दवंडी देत प्रवर्तन संस्था, बोदवडने येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दिव्यांग मंडळ येथे जनजागृती करीत बुधवार, ६ जुलै रोजी सकाळी पथनाट्य सादर केले.

यावेळी दिव्यांग बांधवांची उपस्थिती होती. अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अध्यक्ष डॉ. मारोती पोटे यांच्या संकल्पनेतील कूपनप्रणाली पद्धतीचे राज्यभरात कौतुक झाले आहे.

प्रवर्तन संस्था, बोदवडचे अध्यक्षा दिव्या पालवे, डॉ. धर्मेश पालवे, विजयेंद्र पालवे, कलाकार बुद्धभूषण वाघ, मुकेश सावकारे, नेहा पवार, अशोक नागदेव, ऋषिकेश शिंपी, विनोद सोनवणे यांनी प्रभावी पथनाट्य सादर केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, दिव्यांग मंडळ अध्यक्ष उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड, डॉ. राजेंद्र अग्रवाल, डॉ. निशी शाह उपस्थित होते.

जळगाव जिल्ह्यातून दिव्यांग बांधव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे दिव्यांग तपासणी कार्यवाहीकरिता येत असतात. त्यांना दिव्यांग मंडळ येथे दर बुधवारी तपासणी करून मिळते. त्यासाठी अगोदर ऑनलाईन भरलेला फॉर्म दाखवून कुपन दिले जात असते. कुपनानुसार दर बुधवारी सध्या २०० दिव्यांगांची तपासणी होत आहे. ऑक्टोंबर पासून ही संख्या वाढून २५० करण्यात आलेली आहे. दिव्यांग मंडळाच्या नावाखाली तसेच अनेक एजंट मंडळी हे दिव्यांग बांधवांची फसवणूक करीत असतात. त्यांना प्रमाणपत्र मिळेल अशी खोटी आशा दाखवून त्यांची आर्थिक फसवणूक करीत असतात.

मात्र आता दिव्यांग मंडळाची पारदर्शक कार्यप्रणाली झालेली असल्यामुळे कोणालाही कुठल्याही अनधिकृत व्यक्तीला पैसे देण्याची आवश्यकता उरलेली नाही. त्याच पार्श्वभूमीवर बोदवडच्या प्रवर्तन संस्थेने जनजागृतीपर नाट्य सादर केले.

अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी यावेळी सांगितले की, कुपन प्रणालीचे राज्यभरामध्ये कौतुक झाले आहे. या प्रणालीमुळे दिव्यांग बांधवांना आदर्शपणे तपासणी करता येत आहे, असे त्याने सांगितले.

यावेळी दिव्यांग मंडळातील कर्मचारी विशाल दळवी, चेतन निकम, आरती दुसाने, दत्तात्रय पवार, जनसंपर्क सहाय्यक विश्वजीत चौधरी, अजय जाधव, प्रकाश पाटील, विशाल पाटील, राकेश पिंपरकर, मनोज तोरे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Protected Content