रिसॉर्ट परबांच्या मालकीचे नाही तर कर भरला कसा? सोमय्या

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | शिवसेनचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या मालमत्तांवर इडी कडून कारवाई करण्यात आली. यावर दापोलीतील रिसॉर्टशी  कोणताही संबंध नाही, असा दावा परब यांनी केला. यावर रिसॉर्ट परबांच्या मालकीचे नाही तर कर भरला कसा? असा प्रश्न भाजपचे किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

महाविकास आघाडीतले माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर वसुली, बिनखात्याचे मंत्री मलिक यांच्यावर मनी लॉड्रिंग प्रकरणी अटकेत आहेत. तर आता मविआचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या ७ ठिकाणी असलेल्या मालमत्तांवर छापे टाकत ईडीकडून कारवाई सुरु आहे. यातील दापोलीतील रिसॉर्टशी माझा कोणताही संबंध नाही, दापोलीतील रिसॉर्ट माझ्या मालकीचे नसून हे रिसॉर्ट सदानंद कदम यांचे असल्याचा दावाही अनिल परब यांनी केला. असे असेल तर, डिसेंबर २०२० मध्ये अनिल परब यांनी या दापोलीच्या रिसॉर्ट जागेचा मालमत्ता कर का भरला?, असा प्रश्न सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.

१७ डिसेंबर २०२० रोजी मुरूड ग्रामपंचायतीमध्ये अनिल परब यांनी रिसॉर्टच्या जागेसाठी मालमत्ता कर भरल्याची पावती, तसेच डिसेंबर २०१९ मध्येही अनिल परब यांनी रिसॉर्टच्या जागेचा मालमत्ता कर, घरपट्टी आणि दिवाबत्ती कर भरला आहे. जर हे रिसॉर्ट सदानंद कदम यांच्या मालकीचे असेल तर मग अनिल परब यांनी मालमत्ता कर भरलाच कसा? असा प्रश्न किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित करीत अनिल परब यांच्यावर जोरदार टीका केली.

मंत्री अनिल परब यांच्या नावावर मुरूडमधील मालमत्ता घर क्र. १०६२ आहे. हा भूखंड १६८०० स्क्वेअर फुटांचा असून त्याची बाजारभावानुसारची किंमत सुमारे २५ कोटी रुपये आहे. मार्च २०२० मध्ये करोनाची साथ असताना अनिल परब यांनी या रिसॉर्टसाठी वीजेचा मीटर मिळवण्यासाठी महावितरणकडे अर्ज केला असल्याचेही सोमय्या यांनी म्हटले आहे.

Protected Content