‘लो-प्रोफाईल’ गिरीश चौधरी ‘हाय-प्रोफाईल’ प्रकरणात अडकले कसे ?

जळगाव प्रतिनिधी | सार्वजनीक जीवनात फारसे समोर न दिसणारे एकनाथराव खडसे यांचे मोठे जावई गिरीश चौधरी यांना ईडीने ताब्यात घेतल्याने सर्वांना आश्‍चर्याचा धक्का बसला आहे. खरं तर खडसेंची ज्येष्ठ कन्या आणि जावई हे सार्वजनीक जीवनात कधीही सक्रीय दिसले नसून व विशेषत: गिरीश चौधरी हे अत्यंत ‘लो-प्रोफाईल’ असतांना ईडीने केलेल्या कारवाईचे आश्‍चर्य वाटत आहे. ते या प्रकरणात अडकले कसे ? हे जाणून घ्या.

गिरीश दयाराम चौधरी हे मूळचे ममुराबाद (ता. जळगाव) येथील रहिवासी होत. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची थोरली कन्या शारदा यांच्याशी त्यांचा विवाह झालेला आहे. विवाहानंतर हे दाम्पत्य अनेक वर्षे विदेशात होते. ते तिकडेच स्थायीक झाले होते.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथराव खडसे यांच्याकडे महसूलसह तब्बल १२ खात्यांच्या मंत्रीपदाची जबाबदारी आली. यानंतर चौधरी दाम्पत्य हे भारतात आले. तेव्हापासून त्यांचा इकडचा मुक्काम वाढीस लागला. याच कालावधीत गिरीश चौधरी यांनी आपल्या सासूबाई मंदाताई खडसे यांच्या सोबत भोसरी औद्योगीक वसाहतीला लागून असणारी तीन एकर जमीन घेतली. ही जमीन एमआयडीसीच्या मालकीची असून ती प्रत्यक्षात मूल्यापेक्षा खूप कमी किंमतीत खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला. नंतर हे प्रकरण न्यायालयात गेले. खडसे राष्ट्रवादीत गेल्यानंतर ईडीला अचानक यात भ्रष्टाचार असल्याचा साक्षात्कार झाला. यातून आता गिरीश चौधरी यांना अटक करण्यात आली आहे. यथावकाश यातील कारवाईचे सोपस्कार पार पडतीलच. तथापि, या प्रकरणातील त्यांचा समावेश हा खूप आश्‍चर्यकारक असाच आहे.

गिरीश दयाराम चौधरी हे कोणत्याही प्रकारच्या प्रसिध्दीपासून दूर राहणारे आहेत. ते सार्वजनीक जीवनात देखील फारसे दिसून आले नाहीत. ते ‘एनआरआय’ असून विदेशात त्यांची शैक्षणिक संस्था असल्याची माहिती सोडली तरी त्यांच्याबाबत कुणालाही फार जास्त माहिती नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांची सौभाग्यवती आणि खडसेंची ज्येष्ठ कन्या शारदाताई चौधरी यांनी देखील कधी राजकीय आकांक्षा दाखविली नाही. विशेष करून त्यांची दुसरी कन्या रोहिणीताई खडसे-खेवलकर या आपल्या वडिलांचा राजकीय वारसा पुढे नेत असतांना चौधरी कुटुंब हे आपल्या व्यवसायात मग्न असल्याचे चित्र होते. मात्र खडसे यांचा राजकीय हिशोब चुकता करतांना विरोधकांनी ईडीच्या माध्यमातून त्यांचा याच ‘लो-प्रोफाईल’ जावयावर केलेली कारवाई ही खळबळजनक ठरली आहे.

एकनाथराव खडसे यांनी आपले जावई हे अनिवासी भारतीय असून त्यांनी भोसरी येथील तो भूखंड सनदशीर मार्गाने, पूर्णपणे स्टँप फी चुकवून खरेदी केला असल्याचा युक्तीवाद वारंवार केला आहे. हा व्यवहार करण्याची आर्थिक सक्षमता आपले तसेच जावयाचे कुटुंब असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तथापि, एकनाथराव खडसे यांनी आपल्या मंत्रीपदाचा गैरफायदा घेऊन आपल्या कुटुंबियांना लाभ मिळवून देण्याचा आरोप करण्यात आला असून यातूनच गिरीश चौधरी यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. अर्थात, एका व्यवहारामुळे नाथाभाऊंचा हा कर्तबगार जावई ईडीच्या जाळ्यात अडकल्याचे स्पष्ट झाले आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!