हॉटेलमध्ये वाद घालून तोडफोड, मालक-कामगारांनाही शिवीगाळ

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील शिरसोली रस्त्यावर असलेल्या ‘शुगर ॲण्ड स्पाईसी’ या हॉटेलमध्ये रविवारी १८ मे मध्यरात्रीच्या सुमारास एका टोळक्याने हैदोस घालत मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. एवढेच नाही, तर तोडफोड केल्यानंतर या टोळक्याने हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआरही सोबत घेऊन पळ काढला. ही घटना उघडकीस आल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र सोमवारी १९ मे सायंकाळपर्यंत याप्रकरणी पोलिसांत कोणतीही अधिकृत नोंद करण्यात आलेली नव्हती.

नेमके काय घडले?
शिरसोली रस्त्यावर असलेल्या हॉटेल ‘शुगर ॲण्ड स्पाईसी’ येथे काही तरुण जेवणासाठी आले होते. जेवण झाल्यानंतर या टोळक्याने हॉटेलमध्ये अचानक वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांनी शिवीगाळ करत हॉटेलमधील साहित्याची तोडफोड करण्यास सुरुवात केली. हॉटेलचे मालक आणि कामगारांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनाही शिवीगाळ करण्यात आली.

पोलिसांची धाव, आरोपी पसार
घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळताच, त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, पोलीस पोहोचेपर्यंत धुडगूस घालणारे ते टोळके तेथून पसार झाले होते. हॉटेलमध्ये तोडफोड केल्यानंतर, पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने, या टोळक्याने हॉटेलमध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआरही तोडून सोबत नेला.

या गंभीर प्रकरणानंतरही एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत (१९ मे रोजी) यासंदर्भात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता. यामुळे हॉटेल चालक आणि परिसरातील व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून पुढील कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.