केंद्र सरकारच्या कार्यक्षमता चाचणीत जळगाव रुग्णालयाच्या कामगिरीचा सन्मान

जळगाव प्रतिनिधी । केंद्र शासनाच्या निती आयोगाने जिल्हा रुग्णालयांच्या कार्यक्षमता चाचणीत जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची कामगिरी सर्वोत्तम असल्याचे पत्राद्वारे कळविले आहे. त्यामुळे, केंद्र शासनाच्या मापदंडात अपेक्षेपेक्षा अधिक चांगली कामगिरी केल्याचे दिसून आले आहे. रुग्णालयात केलेल्या चांगल्या कामांची माहिती येत्या दोन आठवड्यात निती आयोगाने अधिष्ठात्यांकडे मागितली आहे.

केंद्र सरकारच्या निती आयोगाने देशातील सर्व जिल्हा रुग्णालयांची कार्यक्षमता चाचणी केली होती. त्याचा उद्देश देशातील प्रत्येक रूग्णालयाबाबत मुलभूत माहिती तयार करणे तसेच, रुग्णालयांच्या सेवेमध्ये श्रेणीवर्धन करणे होते. सदर चाचणीत रुग्णालयांना तीन प्रकारात विभागण्यात आले. यात लहान (२०० पेक्षा कमी खाटा), मध्यम (२०० ते ३०० खाटा) व मोठे रुग्णालय (३०० पेक्षा अधिक खाटा) या निकषाच्या आधारे हि चाचणी घेण्यात आली.  या व्यतिरिक्त निकर्षांचे अ व ब असे दोन प्रवर्गही होते. प्रवर्ग ‘अ’ मध्ये ज्या निकषांची पूर्तता करणे बहुतांशी सरकारच्या हातात होते, अशी निकर्षे तर प्रवर्ग ब मध्ये ज्या निकषांची पूर्तता करणे केवळ रुग्णालय प्रशासनाच्या हातात होते, अशी निकर्षे होती.

या चाचणीअंती महाराष्ट्र राज्यातील पाच रुग्णालये आली. त्यात दोन रुग्णालयांनी प्रवर्ग ‘अ’ च्या निकषात तर प्रवर्ग ‘ब’ मध्ये तीन रुग्णालयांनी सर्वोत्तम कामगिरी केल्याचे निष्पन्न झाले. यात ‘अ’ मध्ये उपजिल्हा रुग्णालय, कुडाळ जि.सिंधुदुर्ग, जिल्हा रुग्णालय, सातारा तर ‘ब’ प्रवर्गात ठाणे रुग्णालय, अहमदनगर व जळगावचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांचा समावेश झाला आहे. यात कुडाळ हे छोटे रुग्णालय या कॅटेगरीत, त्यानंतर सातारा, ठाणे, नगर हे २०० ते ३०० खाटांच्या क्षमतेचे तर एकमेव जळगावचे शासकीय रुग्णालय हे ३०० पेक्षा जास्त खाटांच्या क्षमतेचे म्हणून केंद्र सरकारच्या चाचणीत आले असून जळगावने रुग्णांच्या तपासणी संख्येवर प्राविण्य मिळविले आहे. याबाबतचे पत्र निती आयोगाचे अतिरिक्त सचिव राकेश सरवाल यांनी राज्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव प्रदीपकुमार व्यास यांना लिहून कळविले आहे. तसेच जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठातांना, हे प्राविण्य मिळविण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या याबाबतची माहिती दोन आठवड्यात निती आयोगाकडे पाठवण्याचे कळविले आहे. यामुळे मोठी उपलब्धी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला मिळाली आहे.

“निती आयोगाचे पत्र प्राप्त होताच, डॉक्टरांसह वैद्यकीय यंत्रणेत आनंदाचे वातावरण पसरले आहे. केलेल्या श्रमाचे केंद्राकडून कौतुक झाल्याने प्रोत्साहन मिळाले आहे.” असे अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद म्हणाले आहे. 

 

 

 

Protected Content