मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मनसुख हिरेन यांचे प्रकरण हे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सांगण्यावरूनच घडल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला असून आज त्यांनी पुन्हा एकदा आघाडी सरकारला लक्ष्य केले.
आज एका वाहिनीशी बोलतांना सोमय्या म्हणाले की, महाराष्ट्रात ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे म्हणजे माफिया सेनेचे सरदार दहशत माजवण्याचा प्रयत्न करत आहेत, पोलिसांच्या मदतीने गुंडगिरी चालली आहे त्याची माहिती आम्ही देणार आहोत. शिवसेनेचे गुंड लोकांच्या घरात घुसतात, नेव्ही अधिकार्याला मारहाण करतात, आमदार-खासदारांना जेलमध्ये टाकतात. खार पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांच्या मदतीने झेड सेक्युरिटी असणार्याचा जीव घेण्याचा प्रयत्न करतात. तुझा मनसुख हिरेन करु अशा धमक्या दिल्या जात आहेत असा आरोप सोमय्यांनी केला आहे.
सोमय्या पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरे जगाला मूर्ख समजत आहे. या सरकारमध्ये अक्कल आहे का? पोलीस मला शिवसैनिकांना दोन किमी लांब पाठवलं अशून सुरक्षित असल्याचं सांगतात आणि ड्रायव्हरच्या दारात ७० गुंड दगड, चप्पल, काचेच्या बाटल्या घेऊन उभे होते. गाडीवर हल्ला करतात, काचा फुटतात आणि त्या उद्धव ठाकरेंचं सरकार ड्रायव्हरने बेदरकारपणे गाडी चालवली म्हणतं. यांचे गुंड कमांडोंना मारहाण केली जाते. ड्रायव्हरवर गुन्हा नोंद करतात म्हणजे तर हद्द झाली आहे, अशी टीका यावेळी किरीट सोमय्यांनी केली.
खारच्या घटनेतच यांचे १०० अपराध झाले आहेत. म्हणून या उद्धव ठाकरेंना मी आव्हान देतो आहे. मनसुख हिरेन उद्धव ठाकरेंनी घडवला. प्रदीप शर्मांची, सचिन वाझेंची नियुक्ती कोणी केली? उद्धव ठाकरेंनी.आणि आता उद्धव ठाकरे आम्हाला तुमचा मनसुख हिरेन करु अशी धमकी पाठवतात. अरे सात जन्म मनसुख हिरेन केला तरी या माफिया सरकारचा अंत आणणार, असा इशारा किरीट सोमय्यांनी दिला आहे. केंद्राचं पथक राज्यात पाठवण्यासाठी गृहसचिवांना विनंती करणार असल्याचंही किरीट सोमय्या यांनी सांगितलं आहे.