यशवंत सिन्हांकडे तृणमूल काँग्रेसचे उपाध्यक्षपद

 

कोलकाता : वृत्तसंस्था । तृणमूल काँग्रेसमध्ये दाखल झाल्यानंतर दोनच दिवसांत माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांना पक्षाचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यांना टीएमसीच्या राष्ट्रीय कार्यसमितीचा सदस्यही बनविण्यात आले आहे.

 

 

ममता बॅनर्जींचा बालेकिल्ला असलेल्या पश्चिम बंगालसह पाच राज्यांमध्ये पुढच्या महिन्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. एकेकाळी भाजपाचे महत्वाचे नेते असलेले यशवंत सिन्हा यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला यामागे तृणमूल काँग्रेसची काय रणनिती आहे याची चिन्हे आता दिसू लागली आहेत.

 

 

 

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात कॅबिनेट मंत्री असलेले आणि एकेकाळचे भाजपाचे थिंक टँक, यशवंत सिन्हा शनिवारी टीएमसीमध्ये दाखल झाले. टीएमसीमध्ये प्रवेश घेतल्यानंतर सिन्हा म्हणाले की, नंदीग्राम येथे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावरील हल्ला म्हणजे “सक्रिय टिपिंग पॉईंट” आहे आणि त्यामुळेच मला सक्रिय पक्षीय राजकारणात परत येण्यास भाग पाडले आहे.

 

ममता बॅनर्जी १० मार्च रोजी नंदीग्राम येथे प्रचारादरम्यान झालेल्या घटनेत जखमी झाल्या होत्या. नंदीग्रामधूनच त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भाजपा नेते सुवेन्दु अधिकारी बॅनर्जींविरोधात लढणार आहेत. ममता बॅनर्जी यांनी असा आरोप केला की, ही घटना म्हणजे ‘खोलवर रुजलेला कट’ आहे. निवडणूक आयोगाने आपल्या प्राथमिक अहवालात बॅनर्जी यांच्यावरील कोणत्याही हल्ल्याचा इन्कार केला आहे.

 

शनिवारी टीएमसी भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना सिन्हा म्हणाले, “हे भाजपाचे सरकार निवडणूक जिंकण्यासाठी काहीही करू शकते. ममताजी यांच्यावरील हल्ल्यामुळे मला त्यांच्याबरोबर काम करायचे आहे.” ते म्हणाले की देशातील लोकशाही धोक्यात आली आहे आणि टीएमसीने मोठ्या प्रमाणात बहुमत मिळवून मतदान जिंकले पाहिजे याची काळजी घेणे ही काळाची गरज आहे.

Protected Content