बाबरी मशीदवर चढून तिला पाडण्यास मी मदत केली : साध्वी प्रज्ञा

sadhvi pragya

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) मी बाबरी मशीदीच्या वर चढले होते आणि मशीद पाडण्यास मदत केली होती, असे खळबळजनक विधान भाजपच्या उमेदवार प्रज्ञा सिंह यांनी केले आहे. याची तत्काळ गंभीर दखल घेत निवडणूक आयोगाने आचार संहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी नोटीस जारी केली आहे. दरम्यान, यानिमित्ताने शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करुन नंतर माफी मागणाऱ्या प्रज्ञा सिंह ठाकूरच्या अडचणीत आणखी वाढ होणार आहे. भाजपने भोपाळ मतदारसंघातून काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्याविरोधात प्रज्ञा सिंहला रिंगणात उतरवले आहे. या उमेदवारीवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

 

माझ्या शापामुळेच करकरेंचा अंत झाल्याचे बेजबाबदार विधान प्रज्ञा सिंह यांनी केले होते. यावरून देशभरात संतापाची लाट पसरली. त्यानंतर त्यांना या वक्तव्या बद्दल माफी मागावी लागली होती. दरम्यान बाबरी मशीद वादग्रस्त वक्तव्या प्रकरणी त्यांना निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली आाहे. साध्वी प्रज्ञा २००८ सालच्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी आहेत. सध्या त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. शनिवारी भोपाळमध्ये झालेल्या एका टीव्ही शो दरम्यान प्रज्ञाने वादग्रस्त विधान केले. राम मंदीर निश्चित बांधणार आणि हे एक भव्य मंदीर असेल असा पुनरोच्चार तिने केला. बाबरी मशीदचा ढाचा तोडण्यास ईश्वराने मला ताकद आणि संधी दिली याबद्दल मला गर्व आहे असे प्रज्ञा म्हणाली. एकमेकांविरोधात ज्या तक्रारी आयोगाकडे येत आहेत त्यावरून नेते भडकाऊ भाषण देत असल्याचे स्पष्ट होत आहे हे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. यामुळे समाजात द्वेष पसरत असल्याचेही आयोगाने म्हटले आहे.

Add Comment

Protected Content