Home Uncategorized गोदावरी कॅम्पसच्या ‘राजा’ला भावपूर्ण निरोप; ढोल-ताशांच्या गजरात विसर्जन सोहळा उत्साहात

गोदावरी कॅम्पसच्या ‘राजा’ला भावपूर्ण निरोप; ढोल-ताशांच्या गजरात विसर्जन सोहळा उत्साहात

0
20


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च आणि डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन येथे विराजमान झालेल्या ‘गोदावरी कॅम्पसच्या राजा’ला भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात भावपूर्ण निरोप देण्यात आला. ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण आणि ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात गणरायाच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.

यावेळी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते श्री गणरायाची आरती करण्यात आली. आरतीनंतर गणेशभक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी आणि गणेशभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी होत गणरायाला निरोप दिला.

गणेशोत्सवाच्या कालावधीत महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी हरिश्चंद्रगडावरील प्रसिद्ध केदारेश्वर गुहा मंदिराचा आकर्षक देखावा साकारला होता. विद्यार्थिनींच्या कल्पकतेतून आणि कलात्मकतेतून साकारलेल्या या देखाव्याने गणेशोत्सवात विशेष आकर्षण निर्माण केले.

यंदाच्या गणेशोत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे गोदावरी फाउंडेशन आणि रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलाईट यांच्या वतीने राबविण्यात आलेला ‘सहयोग निधी प्रकल्प’. या उपक्रमाला विद्यार्थिनींसह नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या प्रकल्पांतर्गत श्री गणेशमूर्तींच्या विक्रीतून जमा झालेला निधी अनाथ मुलांच्या संगोपन, शिक्षण आणि कल्याणासाठी सुपूर्द करण्यात येणार आहे.

गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा हा उपक्रम ठरला. भक्ती आणि उत्सवाच्या वातावरणासोबतच गरजू मुलांच्या शिक्षण व संगोपनासाठी मदतीचा हात देण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. त्यामुळे गोदावरी कॅम्पसच्या गणेशोत्सवाला सामाजिक संवेदनशीलतेचीही जोड मिळाली.

विसर्जन मिरवणुकीत ढोल-ताशांचा निनाद, गुलालाची उधळण आणि गणरायाच्या जयघोषामुळे परिसर भक्तिमय झाला होता. विद्यार्थिनी आणि उपस्थित गणेशभक्तांनी उत्साहात सहभाग घेत गणरायाला भावपूर्ण निरोप दिला.

यावेळी महाविद्यालयाचे संचालक डॉ. प्रशांत वारके, डॉ. निलीमा वारके, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सर्वांच्या सहभागामुळे विसर्जन सोहळा उत्साहात पार पडला.

 


Protected Content

Play sound