Home Uncategorized आमदार किशोर पाटलांच्या पाठपुराव्याला यश; अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी बागायत दराने ४५.४९ कोटी...

आमदार किशोर पाटलांच्या पाठपुराव्याला यश; अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी बागायत दराने ४५.४९ कोटी मंजूर

0
20


भडगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते, परंतु प्रशासनाकडून बागायती क्षेत्राला जिरायती दराने मदत देण्यात आल्यामुळे शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले होते. या अन्यायाविरुद्ध आमदार किशोर आप्पा पाटील यांनी शासनस्तरावर केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर मोठे यश आले असून शासनाने बागायत दराप्रमाणे तब्बल ४५ कोटी ४८ लाख ७६ हजार रुपयांचा वाढीव निधी मंजूर केला आहे.

सप्टेंबर २०२५ मधील अतिवृष्टीमुळे मतदारसंघातील कापूस पिकाचे अतोनात नुकसान झाले होते. सुरुवातीला प्रशासनाने संपूर्ण परिसरातील कापूस पीक जिरायत दाखवून प्रति हेक्टरी ८,५०० रुपयांप्रमाणे मदत वितरित केली होती. मात्र, प्रत्यक्षात अनेक शेतकऱ्यांची पिके बागायती असल्याने त्यांना नियमानुसार प्रति हेक्टरी १७,००० रुपये मदत मिळणे अपेक्षित होते. शेजारच्या तालुक्यांमध्ये जिरायत आणि बागायत अशा दोन्ही दरांचे लाभ मिळाले असताना पाचोरा-भडगावमधील बागायतदार शेतकरी मात्र या मोबदल्यापासून वंचित राहिल्याने त्यांच्यावर मोठा अन्याय झाला होता.
शेतकऱ्यांवरील हा अन्याय दूर करण्यासाठी आमदार किशोर आप्पा पाटील यांनी तत्काळ पुढाकार घेऊन प्रशासनाकडून सुधारित पंचनामे आणि अहवाल तयार करून घेतले. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार तसेच मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेऊन पत्रव्यवहाराद्वारे आक्रमक पाठपुरावा केला. या पाठपुराव्याची गंभीर दखल घेत मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत या मागणीला मंजुरी देण्यात आली आणि अखेर २१ सप्टेंबर २०२६ रोजी मदत व पुनर्वसन विभागाने याबाबतचा अधिकृत शासन निर्णय (GR) निर्गमित केला.
शासनाने मंजूर केलेल्या तालुकानिहाय निधीनुसार, पाचोरा तालुक्यात ० ते २ हेक्टर क्षेत्रातील ३१,१७६.७६ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी २६ कोटी ५० लाख रुपये आणि २ ते ३ हेक्टर वाढीव क्षेत्रातील ८५७.६७ हेक्टरसाठी ७२ लाख ९० हजार रुपये असे एकूण २७ कोटी २२ लाख ९२ हजार रुपये मंजूर झाले आहेत. दुसरीकडे, भडगाव तालुक्यात ० ते २ हेक्टर क्षेत्रातील १७,१८४.३६ हेक्टरसाठी १४ कोटी ६० लाख ६७ हजार रुपये आणि २ ते ३ हेक्टर वाढीव क्षेत्रातील ४,२९६.०९ हेक्टरसाठी ३ कोटी ६५ लाख १७ हजार रुपये असे एकूण १८ कोटी २५ लाख ८४ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
सदर मदतनिधी थेट डीबीटी (DBT) प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. विशेष म्हणजे नैसर्गिक आपत्तीपोटी मिळणारा हा मदतनिधी बँकांनी कोणत्याही जुन्या कर्जवसुलीसाठी वळती करून घेऊ नये, असे स्पष्ट व सक्त निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे ऐन दुष्काळसदृश परिस्थितीत पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील हजारो शेतकरी बांधवांना मोठा आर्थिक आधार मिळाला आहे.
या निर्णयावर बोलताना आमदार किशोर पाटील यांनी सांगितले की, “शेतकऱ्यांचे अश्रू पुसणे हे माझे प्रथम कर्तव्य आहे. अतिवृष्टीमुळे बळीराजा संकटात सापडला असताना त्याला जिरायती दराने मदत मिळणे अन्यायकारक होते. म्हणूनच बागायत क्षेत्राचा योग्य मोबदला मिळवून देण्यासाठी मी सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला. ही मदत मंजूर केल्याबद्दल मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्र्यांचे आभार मानतो.” तसेच मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी, “पाचोरा-भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला असून, यापुढेही शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आमचा विभाग कायम कटिबद्ध राहील,” अशी ग्वाही दिली.
पाचोरा व भडगाव तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बागायत दराने ४५.४९ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले असून ऐन आर्थिक अडचणीच्या काळात बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे.

Protected Content

Play sound