नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिवसेनेवर नेमकी मालकी कुणाची ? याच्यासह राज्यातील सत्ता संघर्षावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार असून याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
उध्दव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या गटांसाठी आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे. शिवसेनेवरील मालकीपासून ते राज्यात सत्ता स्थापन करण्याबाबतच्या अनेक मुद्यांवरून आज सुप्रीम कोर्टात महत्वाची सुनावणी होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील आमदारांनी विधानसभा उपाध्यक्षांनी बजावलेल्या नोटिशींना आव्हान दिले असून, शिंदे सरकारची वैधता, विधानसभा अध्यक्षांची निवड यासह काही मुद्दयांवर शिवसेना नेते सुभाष देसाई, प्रतोद सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. विधिमंडळ गटनेतेपदावरून हकालपट्टी आणि प्रभू यांच्या मुख्य प्रतोदपदी नियुक्तीस शिंदे आणि त्यांच्या गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी आव्हान दिले आहे. या सर्व याचिकांवर न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती एम. आर. शहा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह यांच्या पाच सदस्यीय घटनापीठापुढे आज सुनावणी होणार आहे.
आजच्या सुनावणीचे वैशिष्ट्य म्हणजे या प्रक्रियेचे पहिल्यांदाच लाईव्ह स्ट्रीमींग करण्यात येणार आहे. अर्थात, कुणीही हे स्ट्रीमींग पाहू शकणार आहे. आजच्या सुनावणीत ठोस निर्णय होण्याची शक्यता देखील आहे.