मतदान टक्का वाढविण्यासाठी आरोग्य यंत्रणा होणार कार्यान्वित

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता जिल्ह्यातील रावेर व जळगाव लोकसभा मतदारसंघात 13 मे 2024 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदानाच्या दिवशी जिल्ह्यात गरोदर माता, दिव्यांग व जेष्ठ नागरिक यांचा मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर सुरक्षिततेच्या दृष्टीने विविध उपाययोजना करण्यासोबतच आरोग्याच्या कोणत्याही समस्या मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी येणाऱ्या मतदारांना उद्भवू नये याकरिता आरोग्य विभागाचे पथकासोबतच आशा स्वयंसेविका व अंगणवाडी सेविकांना मतदान प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात सहभागी करून घेण्यात येणार आहे. याबाबतच्या सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी आरोग्य यंत्रणेला दिले आहेत.

जळगाव जिल्ह्यातील दोन्हीही लोकसभा मतदारसंघात 13 मे 2024 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. सध्या सुरू असलेला उन्हाळा व मे महिन्यात तापमानाचा पारा वाढू शकतो हे लक्षात घेऊन उन्हाचा कोणताही परिणाम मतदान प्रक्रियेवर होऊ नये याकरिता जिल्हा प्रशासनातर्फे पूर्णपणे दक्षता घेण्यात येत आहे. जळगाव जिल्ह्यात सद्यस्थितीत 61 हजारगरोदर माता आहेत.वाढत्या उन्हाचा परिणाम गरोदर मातांच्या प्रकृतीवर होऊ नये व गरोदर मातांसह दिव्यांग बांधव ज्येष्ठ नागरिकांचे मतदानाचे प्रमाण वाढावे याकरिता सकाळ सत्रात ऊन वाढण्याच्या अगोदरच या तीनही घटकातील मतदारांनी उस्फूर्तपणे मतदानासाठी बाहेर पडावे याकरिता जिल्ह्यात आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर आरोग्याच्या दृष्टीने सर्व सोयी सुविधा पुरवण्याकरिता दक्षता घेण्यात येणार आहे. याबरोबरच अलीकडे बाळंत झालेल्या महिलांना आपल्या बाळासोबत मतदान केंद्रावर येऊन मतदानाचा हक्क बजावता यावा याकरिता मतदान केंद्रांवर पाळणा घर देखील स्थापन करण्यात येणार आहेत.

घरगुती काम करण्यात व्यस्त असलेल्या महिलांना मतदानाचा हक्क बजावता यावा याकरिता काही वेळ सुट्टी देण्यात यावी असे आवाहन देखील जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. यासाठी जिल्ह्यातील तीन हजार अशा स्वयंसेविका व 3 हजार 941 अंगणवाडी सेविका या कामात सहभागी होणार आहेत. गरोदर माता, दिव्यांग व जेष्ठ नागरिकांनी उन्हाचा पारा वाढण्या आगोदर सकाळ सत्रात जास्तीत जास्त मतदान करावे याकरिता घरोघर जाऊन आशा स्वयंसेवी का जनजागृती करणार आहेत. कडाक्याच्या उन्हामुळे मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी आलेल्या मतदारांना काही त्रास उद्भवल्यास लागलीच त्यांच्यावर उपचार करता यावे याकरिता आरोग्य विभागाचे स्वतंत्र पथक प्रत्येक मतदान केंद्रावर तैनात करण्यात येणार आहे.वाढते ऊन ,आरोग्य आणि इतर कारणामुळे मतदानासाठी घराबाहेर न पडणाऱ्या मतदारांमध्ये जनजागृती निर्माण करून अधिक प्रमाणात मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्याकरिता आरोग्य कर्मचारी,आशा स्वयंसेविका व अंगणवाडी सेविकांनी मोठ्या प्रमाणात मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

Protected Content