दारूला पैसे दिले नाही म्हणून लोखंडी अँगलने केली मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील बीग बाजार परिसरात पटांगणात दारूसाठी पैसे मागितल्याच्या कारणावरून एकाला लोखंडी अँगलने बेदम मारहाण केल्याची घटना मंगळवार ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता घडली. याप्रकरणी गुरूवारी ७ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, प्रविण देविदास पाटील वय-४५ रा. शिवाजी नगर, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मजूरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. मंगळवारी ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास प्रविण पाटील हे शहरातील बीग बाजार परिसरातील पटांगणात उभे होते. त्यावेळी कैलास (पुर्ण नाव माहित नाही) रा. जैनाबाद, जळगाव हा त्यांच्याकडे आला. त्यावेळी कैलासने प्रविण पाटील यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. त्यावर प्रविण पाटील यांनी दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिला. याचा राग आल्याने कैलासने शिवीगाळ करत हातातील लोखंडी अँगलने बेदम मारहाण केली. या मारहाणीत प्रविण हा गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. याप्रकरणी गुरूवारी ७ डिसेंबर रोजी सायंकाळी ८ वाजता शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक दिलीप पाटील हे करीत आहे.

Protected Content