नागपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी लोकसंख्या धोरणाबाबत एक महत्त्वाचे विधान केले आहे. लोकसंख्येचा सरासरी वाढीचा दर २.१ टक्क्यांच्या खाली येऊ नये, यासाठी खबरदारी घ्यायला हवी. त्यामुळे दोन-तीन मुले असणे गरजेचे आहे. लोकसंख्या विज्ञान हेच सांगते. जर जन्मदारांचे सरासरी प्रमाण २.१ असेल तर मानवजातीचं अस्तित्व धोक्यात येवू शकते. लोकसंख्या कमी होण्याचे प्रमाण असचं राहिल्यास अनेक भाषा, धर्म आणि संस्कृती नामशेष होतील असे, भागवत म्हणाले.
नागपूर येथील एका कार्यक्रमात बोलतांना मोहन भागवत म्हणाले, ‘लोकसंख्या घट ही चिंतेची बाब आहे. आधुनिक लोकसंख्या विज्ञान सांगतं की जेव्हा जन्मदर २.१ च्या खाली येतो तेव्हा पृथ्वीवरून माणुसकी नष्ट होण्याचा धोका अधिक असतो. अशा परिस्थितीत समाज नष्ट होण्याच्या मार्गावर असतो. ही परिस्थितीत उद्भवल्यास अनेक भाषा, संस्कृती संपुष्टात येण्याचा धोका निर्माण होतो. देशाचे लोकसंख्या धोरण १९९८ किंवा २००२ मध्ये ठरविण्यात आले. लोकसंख्येचा सरासरी वाढीचा दर २.१ पेक्षा कमी नसावा. आमच्यासाठी दोन-तीन मुलं असणं गरजेचे आहे. लोकसंख्येची गरज आहे. कारण समाजाचे अस्तित्व राखण्यासाठी हे गरजेचे आहे.
मोहन भागवत म्हणाले, लोकसंख्येचा असमतोल वाढत चालला आहे. या बाबत अनेक वेळा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पुरुच्चार केला आहे. मोहन भागवत यांनी भारतातील हिंदू लोकसंख्येच्या घटत्या टक्केवारीबद्दल अनेकदा चिंता व्यक्त केली आहे. भारतात हिंदू बहुसंख्य राहिले पाहिजेत आणि त्यामुळे देशाची मूल्ये सुरक्षित आहेत, असा युक्तिवाद देखील भागवत यांनी केला आहे.