
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी नगर येथील हिंदू स्मशानभूमी आणि मुस्लिम कब्रस्तानमधील नागरिकांसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सोयी-सुविधांची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत, अशी मागणी माजी नगरसेवक नवनाथ विश्वनाथ दारकुंडे यांनी महापौरांकडे निवेदनाद्वारे केली आहे. संबंधित कामांसाठी अर्थसंकल्पात तरतूद उपलब्ध असूनही प्रशासकीय पातळीवर फाईली अडकवून ठेवण्यात येत असल्याचा आरोप करत त्यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

छत्रपती शिवाजी नगर परिसरातील हिंदू स्मशानभूमी व मुस्लिम कब्रस्तान या दोन्ही ठिकाणांच्या सुरक्षेचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. माजी नगरसेवक नवनाथ दारकुंडे, नगरसेवक सागर सोनवणे आणि उज्वला बावीस्कर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे दोन्ही ठिकाणी सुरक्षा रक्षक भिंत उभारण्याच्या कामाची वर्क ऑर्डर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तसेच परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे कामदेखील करण्यात आले आहे.
मात्र, सुरक्षेच्या उपाययोजना झाल्यानंतरही नागरिकांच्या दैनंदिन गरजांशी संबंधित अनेक महत्त्वाची कामे अद्याप रखडलेली आहेत. अंत्यसंस्कारासाठी वापरण्यात येणारे ओटे पूर्णपणे जीर्ण झाले असून त्यावरील लोखंडी जाळ्या तुटलेल्या अवस्थेत आहेत. तसेच डोक्यावरचे शेडदेखील मोडकळीस आले असल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या ओट्यांची दुरुस्ती व विस्तार करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
याशिवाय अंत्यविधी व इतर धार्मिक विधींसाठी येणाऱ्या नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी आणि अंघोळीच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. परिसरात नागरिकांना बसण्यासाठी सिमेंटचे बाकडे बसवावीत तसेच अंत्यसंस्कारासाठी लागणाऱ्या लाकडांचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी निविदा प्रक्रिया राबवून कायमस्वरूपी लाकूड पुरवठा सुनिश्चित करावा, अशी मागणीही दारकुंडे यांनी केली आहे.
पूर्वी या कामांसाठी अर्थसंकल्पीय तरतूद नसल्याचे कारण देण्यात येत होते. मात्र आता संबंधित कामांचा अधिकृत अर्थसंकल्पात समावेश झालेला असतानाही काही अधिकारी ‘तत्त्वतः मान्यता नाही’ या कारणावरून फाईल पुढे सरकवण्यास विलंब करत असल्याचा आरोप दारकुंडे यांनी केला आहे. बजेटमध्ये मंजूर झालेल्या कामांसाठी पुन्हा तत्त्वतः मान्यतेची गरज का भासते, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
“जेव्हा एखाद्या कामाला अर्थसंकल्पीय मंजुरी मिळालेली असते, तेव्हा प्रशासकीय प्रक्रियेत अनावश्यक तांत्रिक अडथळे निर्माण करून लोकभावनांशी संबंधित कामे रखडवण्यामागील हेतू काय?” असा प्रश्न उपस्थित करत दारकुंडे यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे.
स्मशानभूमी आणि कब्रस्तानाशी संबंधित कामे ही नागरिकांच्या भावना आणि श्रद्धेशी निगडित असल्याने महापौरांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालावे. संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश देऊन सर्व तांत्रिक अडचणी दूर कराव्यात आणि प्रलंबित कामे युद्धपातळीवर मंजूर करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी नवनाथ दारकुंडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.



