Home Cities रावेर ह्युमन राईट्स विषयात डॉ. संदीप पाटील यांना एलएलएम पदवी प्रदान

ह्युमन राईट्स विषयात डॉ. संदीप पाटील यांना एलएलएम पदवी प्रदान

0
12


रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर शहरातील माऊली फाऊंडेशनचे अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते आणि वैद्यकीय क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असलेले डॉ. संदीप पाटील यांनी ह्युमन राईट्स (मानवी हक्क) विषयात एलएलएम (मास्टर ऑफ लॉ) पदवी यशस्वीरित्या संपादन केली आहे. वैद्यकीय व्यवसाय सांभाळत त्यांनी कायद्याच्या उच्च शिक्षणात मिळवलेले हे यश विशेष उल्लेखनीय मानले जात असून त्यांच्या या शैक्षणिक कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

मध्य प्रदेशातील विद्यापीठातून ह्युमन राईट्स विषयात एलएलएम पदवी प्राप्त करून डॉ. संदीप पाटील यांनी आपल्या शैक्षणिक वाटचालीत आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. वैद्यकीय क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत असतानाच त्यांनी कायद्याच्या क्षेत्रातही उच्च शिक्षण पूर्ण केले असून रावेर तालुक्यात वैद्यकीय व्यवसायासोबत एलएलएम पदवी संपादन करणारे ते पहिले डॉक्टर ठरल्याची माहिती समोर आली आहे.

डॉ. पाटील हे सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असून वंचित, गरजू आणि दुर्बल घटकांच्या विविध प्रश्नांवर संवेदनशीलपणे काम करतात. माऊली फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. समाजातील वंचित घटकांना न्याय मिळावा, त्यांच्या हक्कांविषयी जनजागृती व्हावी आणि सामाजिक न्यायाची भावना अधिक बळकट व्हावी या उद्देशाने त्यांनी मानवी हक्क या विषयाचा सखोल अभ्यास करण्याचा निर्णय घेतला होता.

ह्युमन राईट्स विषयातील एलएलएम पदवीमुळे मानवी हक्क, सामाजिक न्याय आणि कायदेशीर अधिकार याविषयीचे त्यांचे ज्ञान अधिक समृद्ध झाले असून याचा उपयोग भविष्यात सामाजिक कार्यासाठी अधिक प्रभावीपणे होणार असल्याची भावना त्यांच्या सहकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. वैद्यकीय क्षेत्रातील जबाबदाऱ्या सांभाळत उच्च शिक्षण पूर्ण करणे हे मोठे आव्हान असतानाही त्यांनी चिकाटी, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे.

डॉ. संदीप पाटील यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल विविध सामाजिक, शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. त्यांच्या या यशामुळे रावेर तालुक्याच्या शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. तरुणांनी उच्च शिक्षणासाठी सातत्याने प्रयत्नशील राहावे आणि विविध क्षेत्रांमध्ये ज्ञान संपादन करावे, असा प्रेरणादायी संदेश त्यांच्या या यशातून मिळत असल्याचे मतही व्यक्त केले जात आहे.

ह्युमन राईट्स विषयातील एलएलएम पदवी संपादन केल्याबद्दल प्राचार्य डॉ. मोहन सोनी यांनी डॉ. संदीप पाटील यांचे विशेष अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील शैक्षणिक, सामाजिक आणि व्यावसायिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. भविष्यातही ते समाजहिताच्या कार्यात अधिक प्रभावी योगदान देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


Protected Content

Play sound