जळगाव प्रतिनिधी । विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यातील लक्ष्य निश्चित करा, त्या मार्गावर प्रामाणिकपणे जाण्याचा प्रयत्न करा, या मार्गात संघर्ष अटळ आहे. याची जाणीव ठेवा आणि प्राप्त झालेल्या यशाची हवा डोक्यात जाऊ देऊ नका, असे प्रतिपादन मिस इंडिया मल्टीनॅशनल विजेत्या तन्वी मल्हारा यांनी केले आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात विद्यार्थ्यांशी आयोजित संवाद कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात विद्यार्थ्यांशी आयोजित संवाद कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. त्यावेळी तन्वी मल्हारा म्हणाल्या की, मिस इंडिया किताब जिंकण्याचे स्वप्न लहानपणापासूनच पाहिले होते. आई-वडीलांनी या स्वप्नाला खतपाणी घातले. बाह्य सुंदरतेपेक्षा अंतरंग, संभाषण कौशल्य, समयसूचकता महत्वाची असते. मिस दिवा किताब जिंकल्यानंतर आत्मविश्वास वाढला. नाशिक येथे रेडिओ जॉकी म्हणून काम करतांना अनेक अनुभव घेतले. स्वत:वर विश्वास ठेवा, निराश होऊ नका, अपयशाने न खचता प्रयत्न करा, यश प्राप्त होईल. असा सल्ला विद्यार्थिंनींना त्यांनी दिला. यावेळी आनंद मल्हारा यांनी पालकांचा मुलांवर विश्वास हवा आणि त्यांना पाठबळ द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. याप्रसंगी मंचावर आनंद मल्हारा, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. रत्नमाला बेंद्रे, डॉ. मनिषा इंदाणी, डॉ. किर्ती कमलजा उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शिवानी पालीवाल या विद्यार्थिंनीने केले. मोहिनी झांबरे हिने परिचय करुन दिला. डॉ. रत्नमाला बेंद्रे यांनी अध्यक्षीय समारोप केला.