हतनूर धरणात तीन टक्के जलसाठा; १३० गावांचा पाणीपुरवठा संकटात (व्हिडीओ)

hhnur dharan

भुसावळ प्रतिनिधी । हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या वर्षी मान्सूनोत्तर आवक नगण्य राहिली. यामुळे १०० टक्के धरण भरल्यावरही यंदा टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. हतनूर धरणात गेल्या वर्षाच्या तुलनेत तब्बल १२ टक्के अल्प जलसाठा आहे. यामुळे आता हतनूर धरणावर अवलंबून असलेली तब्बल १३० गावे, रेल्वे, आयुध निर्माणी आदींना मे महिन्याच्या शेवटच्या पंधरवड्यात तीव्र टंचाईच्या झळा सोसाव्या लागणार आहेत. मे महिन्याच्या सुरूवातीलाच हतनूर धरणात केवळ ३ टक्के जलसाठा शिल्लक आहे.

गेल्या मान्सून हंगामात सरासरीच्या तुलनेत ५० टक्के पाऊस झाला. हतनूर धरण उभारणी झालेल्या तापी आणि पूर्णाच्या पाणलोट क्षेत्रातही अल्प प्रमाणात झालेल्या पावसामुळे यंदा हतनूरमध्ये मान्सूनोत्तर पाण्याची आवक झाली नाही. दुष्काळी स्थितीत विभागासाठी पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्त्रोत ठरलेल्या हतनूर धरणात सध्या केवळ ३.०१ टक्के जलसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी याच काळात धरणात १४.९८ टक्के जलसाठा शिल्लक होता. यामुळे आता आगामी पावसाळ्यापर्यंत धरणाचा पाणीसाठा कितपत टिकेल, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मागील वर्षाचा तुलनात्मक अभ्यास केल्यास यंदा अत्यल्प आहे. हतनूर धरणाच्या वरच्या बाजूने मलकापूर शहर आणि एमआयडीसी, मुक्ताईनगर तालुक्यातील पाणीपुरवठ्याच्या योजना, आयुध निर्माणी वरणगाव आदींना पाणीपुरवठा होतो. धरणातील जिवंत जलसाठा जवळपास संपण्याच्या मार्गांवर असल्याने आता या पाणीपुरवठा योजना मे महिन्याच्या अखेरच्या पंधरवड्यात ठप्प होण्याची भीती आहे. हतनूर धरणाच्या इतिहासात आतापर्यंत अशी बिकट स्थिती निर्माण झाली नाही. धरणाच्या वरील बाजूकडील ४० किमीपर्यंतच्या भागात पाण्याची पातळी कायम असली तरी आता ठिकठिकाणी गाळ दिसू लागला आहे. दररोज होणाऱ्या बाष्पीभवनामुळे या पाण्याची जलदगतीने वाफ होत आहे.

हतनूरवर अवलंबून असलेल्या तब्बल १३० गावांच्या पाणीपुरवठा योजना, भुसावळ, सावदा, यावल, अमळनेर, धरणगाव आदी नगरपालिका आणि रेल्वे, आयुध निर्माणी भुसावळ आणि वरणगाव, जळगाव व मलकापूर एमआयडीसी आदींना यामुळे मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात तीव्र पाणीटंचाई सोसावी लागणार आहे. त्यामु‌ळे उपलब्ध साठ्याचा अत्यंत जपून वापर होणे आवश्यक आहे. हतनूरचा जलसाठा यंदा कमालीने खालावला आहे. मध्य प्रदेशातील पर्जन्यावरच हतनूर धरण भरते. यंदा पाणलोटक्षेत्रात मान्सूनोत्तर पाऊस झाला नाही, यामुळे जलसाठ्याची स्थिती बिकट आहे. अशा स्थितीत सर्व पाणीवापर संस्थांनी पाण्याची बचत करुन साठा टिकवून ठेवण्यासाठी सहकार्य करावे.

Add Comment

Protected Content