सावदा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ‘घरातील कामे हळूवार करते.’ असे म्हणत विवाहितेला उपाशी ठेवून मारहाण करून छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, “रावेर तालुक्यातील रोझोदा येथील माहेर असलेल्या मोहिनी प्रशांत बऱ्हाटे (वय-२३) यांचा विवाह रावेर तालुक्यातील उदळी खुर्द येथील प्रशांत लक्ष्मण बऱ्हाटे यांच्याशी सन २०२० मध्ये रितीरिवाजानुसार झाला. लग्नानंतर सुरूवातीचे काही दिवस चांगले गेल्यानंतर पती प्रशांत बऱ्हाटे याने विवाहितेला गतीमंद असल्याचे हिनवून ‘तू हळूवार काम करते, कामाला उशीर लावते‘ असे बोलून तिला शिवीगाळ करायला सुरूवात केली. त्यानंतर पती प्रशांत बऱ्हाटे, सासरे लक्ष्मण भागवत बऱ्हाटे, सासू सुलभा लक्ष्माण बऱ्हाटे आणि दीर राहूल लक्ष्मण बऱ्हाटे सर्व रा. उदळी खुर्द ता. रावेर यांनी वेळोवेळी तिला उपाशी ठेवले. तसेच तिला चापटाबुक्क्यांनी देखील मारहाण केली.
या छळाला कंटाळून विवाहिता या माहेरी निघून आल्या. विवाहितेने सावदा पोलीस ठाण्यात सासरच्या मंडळींविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पतीसह सासरच्या मंडळीविरोधात सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला सहाय्यक फौजदार ममता तडवी करीत आहे.