हनुमान जन्मोत्सवानिमित्त श्री मंगळग्रह मंदिरात हनुमान यागाचे आयोजन

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | हनुमान जन्मोत्सवानिमित्त अमळनेर येथील श्री मंगळग्रह मंदिरात आज भव्य हनुमान याग आयोजित करण्यात आला. विविध क्षेत्रातील नऊ यजमानांनी सपत्नीक विधिपूर्वक हा याग पार पाडला. या धार्मिक विधींमुळे मंदिरात अध्यात्मिक वातावरण निर्माण झाले होते.

कार्यक्रमाची सुरुवात गणपती पूजनाने झाली. त्यानंतर पुण्याहवाचन, मातृका पूजन, सर्वतोभद्र मंडल व नवग्रह मंडलाची स्थापना करण्यात आली. यानंतर रुद्रकलश पूजन, श्री पंचमुखी हनुमंत महाभिषेक, नवग्रह पूजन, सुंदरकांड हवन, दशदिग्पाल व क्षेत्रपाल पूजन पार पडले. अखेरीस वसोरधारा, पूर्णाहुतीने यागाची सांगता झाली. यावेळी हनुमंतांची स्तुतीपर भक्तिगीते सादर करण्यात आली.मंदिरात हनुमंतांची प्रतिमा लावून आकर्षक सजावट करण्यात आली होती. सायंकाळी महाआरतीचे आयोजन करण्यात आले, त्यानंतर सर्व भाविकांना विशेष प्रसाद वितरित करण्यात आला.

भिला गंगाराम पाटील, निलेश दहिवदकर, गुणवंत बापूराव पाटील, वसंत पुरकर, भूपेंद्र जैन, गुणवंत सुरेश वाघ, पंकज कांतीलाल काटे, यशोदीप भास्करराव सोनवणे, दिनेश कापडणीस हे सपत्नीक या विधीसाठी मानकरी होते. या धार्मिक विधीचे पौरोहित्य प्रसाद भंडारी, अतुल दीक्षित, शुभम वैष्णव, जयेंद्र वैद्य, अक्षय जोशी, मंदार कुलकर्णी, वैभव लोकाक्षी, अभिषेक भट यांनी केले. त्यांना उमेश पाठक व किशोर कुलकर्णी यांनी सहकार्य केले.

कार्यक्रमासाठी मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सहसचिव दिलीप बहिरम यांनी विशेष प्रयत्न केले. मंदिरातील सेवेकरी व भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हनुमान जन्मोत्सवानिमित्त आयोजित हा याग श्रद्धा, भक्ती आणि सांस्कृतिक एकतेचे प्रतीक ठरला.

Protected Content