Home Cities धरणगाव लोंबकळणाऱ्या तारा, वाकलेल्या खांबामुळे नागरिकांच्या जीवाला धोका; नागरीकांचा संताप

लोंबकळणाऱ्या तारा, वाकलेल्या खांबामुळे नागरिकांच्या जीवाला धोका; नागरीकांचा संताप

0
144


धरणगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव शहरात आलेल्या वादळी वाऱ्यामुळे मातोश्री नगरात मोठे नुकसान झाले आहे. अनेक झाडे उन्मळून पडल्याने महावितरणच्या विद्युत तारा तुटल्या आहेत, तर काही ठिकाणी इलेक्ट्रिक पोल वाकले आहेत. यामुळे परिसरातील नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून, महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराविरोधात गुरूवारी ८ मे रोजी दुपारी २ वाजता नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

मातोश्री नगरातील रहिवाशांनी या गंभीर परिस्थितीबाबत गेल्या दोन दिवसांपासून महावितरण कंपनीकडे सतत तक्रार केली आहे. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे अद्यापपर्यंत महावितरणचा एकही कर्मचारी या ठिकाणी पाहणीसाठी किंवा दुरुस्तीसाठी आलेला नाही. यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. वाकलेल्या इलेक्ट्रिक पोलमुळे रस्त्यावर ये-जा करणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच तुटलेल्या तारांमुळे शॉर्ट सर्किट होऊन आग लागण्याची किंवा अन्य दुर्घटना घडण्याची भीती आहे. नागरिकांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, जर कुणाच्या अंगावर इलेक्ट्रिक पोल पडला किंवा अन्य कोणतीही दुर्घटना घडली, तर त्याला थेट महावितरण कंपनी जबाबदार असेल.

या धोकादायक परिस्थितीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांनी तातडीने वाकलेले पोल आणि तुटलेल्या विद्युत तारा हटवून विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे. महावितरण कंपनीने या गंभीर तक्रारीची त्वरित दखल घेऊन तातडीने उपाययोजना करावी, अशी आग्रही मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. महावितरणच्या या निष्काळजीपणाबद्दल नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून, लवकरच कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.


Protected Content

Play sound