Home क्राईम सराईत मोटारसायकल चोरटा जेरबंद ; सहा दुचाकी जप्त

सराईत मोटारसायकल चोरटा जेरबंद ; सहा दुचाकी जप्त

0
10

भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहर पोलिसांनी मोटारसायकल चोरीच्या घटनांवर प्रभावी कारवाई करत एका सराईत आरोपीला अटक केली असून, त्याच्याकडून तब्बल सहा चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात यश मिळवले आहे. या कारवाईमुळे भुसावळसह जामनेर, अमळनेर आणि चोपडा परिसरातील मोटारसायकल चोरीच्या अनेक गुन्ह्यांचा उलगडा झाला असून, नागरिकांनी पोलिसांच्या या कामगिरीचे स्वागत केले आहे.

२३ जानेवारी २०२६ रोजी भुसावळ शहरातील झेडटीएस रोडवरील एमओएच पार्किंगमधून सुमारे १५ हजार रुपये किमतीची हिरो मोटोकॉर्प स्प्लेंडर मोटारसायकल अज्ञात चोरट्याने लंपास केली होती. याप्रकरणी विजय जगन्नाथ खडके यांनी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक माहिती, गुप्त बातमीदार तसेच विविध धागेदोरे तपासून आरोपीचा शोध सुरू केला. तपासादरम्यान डी.बी. पथकातील पोलीस कॉन्स्टेबल राहुल बेहेनवाल आणि पोलीस कॉन्स्टेबल कुणाल सोनवणे यांना आरोपी चोपडा बसस्थानक परिसरात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले आणि पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने आपले नाव विशाल राजेंद्र राठोड (वय ४६, रा. भीकनगाव, जि. खरगोन, मध्य प्रदेश) असे सांगितले. पोलिसांनी केलेल्या कसून चौकशीत त्याने भुसावळसह जामनेर आणि अमळनेर परिसरातूनही मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली.

यानंतर पोलिसांनी आरोपीकडून एकूण सहा चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या. या कारवाईमुळे विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या वाहनचोरीच्या गुन्ह्यांच्या तपासाला गती मिळाली असून, आरोपीकडून आणखी काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले आणि पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत पोलीस नाईक अब्दुल रज्जाक खान तसेच पोलीस कॉन्स्टेबल सुबोध मोरे, राहुल बेहेनवाल, कुणाल सोनवणे आणि दीपक पाटील यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.


Protected Content

Play sound