धरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । धरणगाव शहरातील डॉ. हेडगेवार ग्रामपंचायत परिसरात घरफोडीची घटना घडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अज्ञात चोरट्यांनी एका घरात शिरून चांदीच्या देवमूर्ती, सोन्याची चैन आणि अंदाजे १० ते १२ हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली असून, शहरातील वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांनी पोलिसांनी गस्त वाढविण्याची मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. हेडगेवार ग्रामपंचायत परिसरातील रहिवासी नाना महादू वारुळे यांच्या घराला अज्ञात चोरट्यांनी लक्ष्य केले. चोरट्यांनी घरफोडी करून घरातील चांदीचे देव, सोन्याची चैन तसेच अंदाजे १० ते १२ हजार रुपयांची रोकड चोरून नेली. घरातील चोरीचा प्रकार निदर्शनास येताच परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांत शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये असून, रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढविणे, संशयित व्यक्तींवर लक्ष ठेवणे तसेच संवेदनशील भागांमध्ये अधिक प्रभावी सुरक्षा व्यवस्था उभारण्याची मागणी होत आहे. या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला आहे. तसेच अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू करण्यात आला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक बाबींची पडताळणी केली जात आहे.




