मुक्ताईनगर तालुक्यात पुन्हा पकडला गुटखा : ३५.५ लाखांचा ऐवज जप्त

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातून दोन वाहनांमधून अवैधरित्या वाहतूक करण्यात येणारा गुटखा जप्त करण्यात आला असून या प्रकरणी सुमारे ३५.५ लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

या संदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, काल सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास अन्न व औषध प्रशासनाच्या जळगाव येथील पथकाने मुक्ताईनगर ते बर्‍हाणपूरच्या दरम्यान पूर्णा नदीच्या जवळ एमएच२० ईएल ५८४९ आणि एमएच२० १७३७ या क्रमांकांच्या दोन वाहनांमधून वाहतूक करण्यात येणारा प्रतिबंधीत गुटखा, सुगंधी मसाला आणि तत्सम सामग्री जप्त केली. या दोन्ही वाहनांमधून वाहनांसह सुमारे ३५ लाख ५२ हजार रूपये मूल्याचा ऐवज जप्त करण्यात आला.

या प्रकरणी वाहन चालक शकील रशीद शेख ( रा. छत्रपती संभाजीनगर ) व क्लीन फैजान इम्रान काचालिया ( रा. छत्रपती संभाजीनगर) तसेच दुसर्‍या वाहनाचा चालक शेख मोहसीन शेख ईस्माईल व क्लीनर शेख फरहान शेख शाहनवाज यांच्यासह जळगाव येथील सुशील रमेश गेही आणि बर्‍हाणपूर येथील साईनाथ ट्रेडर्सचा संचालक आशीष बुधराणी यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील पहिल्या चार संशयितांना अटक करण्यात आली असून उर्वरित दोघांचा शोध सुरू आहे.

या संदर्भात, अन्न सुरक्षा अधिकारी रामचंद्र मारोतराव भरकड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वर नमूद केलेल्यांच्या विरोधात भादंवि कलम १८८, २७२, २७३; ३२८, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास डीवायएसपी प्रताप शिकारे व प्रभारी अधिकारी तथा सहायक पोलीस निरिक्षक संदीप दुनगहू यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय संदीप चेढे, विजय पवार आदी करत आहेत.

Protected Content