एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आपल्या आजूबाजूला अंधार असतो, तो अंधार भेदण्यासाठी शब्द आधार देतात. मनाचा दिवा आपल्या मनोबलच्या जोरावर लागतो आणि ते मनोबल वाढविण्याचे काम आणि अंधारातून उजेडा कडे जाण्याचा विश्वास गुरु देतो. आई वडिल फक्त जन्म देतात पण जीवन प्रकाशमान करण्याचे काम आणि जन्म सार्थकी लावण्याची शिकवण गुरुच देत असतात असे प्रतिपादन समीरा गुर्जर – जोशी यांनी व्यक्त केले.
स्व.के.एम.महाजन, स्व.डॉ.ब.तु. राठी, स्व.डॉ.अनिल महाजन यांच्या स्मृती प्रित्यर्थ दीपस्तंभ व आर्यन फाऊंडेशन जळगाव , विवेकानंद केंद्र, योगेश्वर नागरी सह.पतसंस्था, राठी हॉस्पिटल एरंडोल आयोजित दीपस्तंभ व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प गुंफताना ‘भारतीय शिक्षण व्यवस्था’ या विषयावर त्या बोलत होत्या. यंदा व्याख्यानमालेचे १६ वे वर्ष आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर प्रांताधिकारी मनीष गायकवाड, एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष शरद काबरा, सचिव श्रीकांत काबरा, डॉ.रवी महाजन, डॉ.रेखा महाजन, यजुर्वेंद्र महाजन उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक योगेश्वर पतसंस्थेचे चेअरमन प्रा.जी आर महाजन यांनी केले. सूत्रसंचालन स्वराली पाठक यांनी तर सन्मानपत्राचे वाचन क्षमा साळी यांनी केले. आभार प्रा.एस.एस.महाजन यांनी मानले. राज्यस्तरीयय आदर्श पुरस्कारप्राप्त मुख्याध्यापिका अंजूषा विसपुते यांचा विशेष सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
गुरुकुल शिक्षण पध्दतीत गुरु शिष्याचे नाते वैयक्तिक संवादाचे असायचे. गुरुकुल मध्ये मनाचे भरण पोषण व्हायचे. शिक्षणाने वैयक्तिक उत्कर्ष अपेक्षित आहे. आजच्या शिक्षण व्यवस्था सर्टिफिकेट वर अवलंबून आहे. विश्वास स्वतःवर नाही तर सर्टिफिकेट वर आहे. सध्याचे गुरू शिष्य नाते विकसित नाहीत. ध्येयासाठी न शिकता आधी शिकण्यासाठी शिकले पाहिजे अश्या भावना समीरा गुर्जर – जोशी यांनी व्यक्त केल्या.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आर.डी.पाटील, प्रा.गणेश महाजन, नरेश डागा, मंगेश पाटील, जगदीश महाजन, महेंद्र पाटील, ज्ञानेश्वर येवले, महेंद्र माळी, दिपक राणा, देवेंद्र पाटील, शेखर सोळुंके, शेखर साळुंके, यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास एरंडोल परिसरातील विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.