विद्यार्थिनीचे ९९ टक्क्यांहून अधिक गुण : अजित पवारांनी जोडले हात

पुणे, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | पुण्यात देशी गोवंश प्रदर्शन आणि प्रात्यक्षिके पाहणी करत विविध वस्तूंविषयी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माहिती घेतली. यावेळी तेथे माहिती देणाऱ्या विद्यार्थिनीला परीक्षेतील मिळालेले ९९ टक्क्यांहून अधिक गुण पाहून पवार यांनी दोन्ही हात जोडले, यावरून उपस्थितांमध्ये हास्य उसळले.

पुणे येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत पशुसंवर्धन केंद्र आणि कृषी महाविद्यालय पुणे यांच्यातर्फे देशी गोवंश प्रदर्शन आणि प्रात्यक्षिकेचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रदर्शनात मांडणी करण्यात आलेल्या विविध वस्तूंची पाहणी करताना उपमुख्यमंत्री वस्तूंविषयी माहिती घेत होते. या प्रदर्शनातील उत्पादनाची माहिती देणाऱ्या तेथीलच एका विद्यार्थिनीला उपमुख्यमंत्री पवार यांनी तिचे परीक्षेतील गुण विचारले. विद्यार्थिनीने ९९ टक्क्यांहून अधिक गुण मिळाले असे सांगताच आश्चर्यचकित होत अजित पवारांनी थेट हात जोडले. अजित पवारांनी हात जोडलेले पाहताच उपस्थितांना हसू आवरले नाही.

पुण्यातील कृषी महाविद्यालय प्रदर्शनात देशी गाईंच्या गोठ्याचे व्यवस्थापन, गोसंवर्धन, दुग्धव्यवसायाच्या संदर्भातील बारकावे, जनावरांचे औषधोपचार, जैव मिश्रण, देशी गाईंच्या गोमुत्र, शेणखताचा उपयोग, व्हर्मीवॉश तसेच दुधापासून अन्य पदार्थ बनवणाऱ्या विभागाची माहिती घेतली. यात चाराकापणी यंत्राविषयी माहिती घेताना यंत्राचे कार्य कसे चालते, चारा किती दिवस टिकतो, वेतन किती मिळते याची तेथे काम करणाऱ्या महिलांचीही आस्थेने चौकशी केली. यांनतर ट्रॅक्टर संचलित मुरघास यंत्र, आजारी असताना जनावरे उचलणी यंत्र यासह नवनिर्मित अवजारांचीही माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाणून घेतली.

Protected Content