जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी देखील जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीच्या रिंगणात उडी घेत आज आपल्या उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
जिल्हा सहकारी दूध संघाच्या आगामी निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या नेत्यांची खलबते सुरू असून याबाबत लवकरच अधिकृत निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे.
जिल्हा सहकारी दूध संघाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याला आता दोन दिवस उरले असतांनाही चित्र स्पष्ट होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या अनुषंगाने आज ना. गिरीश महाजन यांच्या जी.एम. फाऊंडेशनच्या जनसंपर्क कार्यालयात आज भाजप आणि शिंदे गटाची खलबते सुरू आहेत.
दरम्यान, आज सोमवारी अनेक उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यातील लक्षणीय नाव म्हणजे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील होत. गुलाबभाऊंनी आजवर सहकारात प्रवेश केला नव्हता. तथापि, आता ते जिल्हा दुध संघाच्या निवडणुकीत उतरणार असून दुपारी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. पालकमंत्र्यांच्या वतीने त्यांचे चिरंजीव प्रतापराव पाटील यांनी अर्ज दाखल केला. त्यांच्या अर्जाचे सूचक भोकर येथील योगेश लाठी असून अनुमोदक भरत पाटील हे आहेत. आता पालकमंत्र्यांनी अर्ज दाखल केल्याने ही लढाई रंगतदार होण्याची शक्यता आहे.