जळगाव प्रतिनिधी । या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय मुद्द्यांपेक्षा स्थानिक मुद्दे अधिक प्रभावी ठरतील, केंद्र सरकार सगळ्याच आघाड्यांवर अयशस्वी ठरले असून आता जनतेला बदल हवा आहे, त्यामुळे जळगाव मतदार संघातून मोठ्या मताधिक्क्याने माझा विजय निश्चित होईल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, रिपाई आणि मित्रपक्षांच्या महाआघाडीचे अधिकृत उमेदवार गुलाबराव देवकर यांनी आज मलाईव्ह ट्रेंड्स न्यूजफ शी बोलताना व्यक्त केला.
गुलाबराव देवकर पुढे म्हणाले की, माझी जनमानसातली प्रतिमा एक काम करणारा नेता अशी आहे. मी पालकमंत्री असताना जळगाव शहरासह जिल्ह्यात हजारो कोटींची कामे केली आहेत. त्यात ३० कोटी रुपये खर्चाचे संभाजीराजे नाट्यगृह आहे, लांडोर खोरी उद्यानाचा विकास आहे, शहरात पाणी टंचाई असताना महापालिकेला केलेली दोन कोटी ४० लाखांची मदत आहे. याशिवाय जिल्ह्यात केलेली अनेक विकास कामे याची साक्षीदार आहेत. मी नगराध्यक्ष आणि नगरसेवक असतानाही नागरिकांसाठी नेहमीच सोयी-सुविधा पुरवण्याची धडपड केली आहे. भविष्यातही मला खासदार म्हणून सेवेची संधी मिळाली तर मी शहर व मतदार संघाचा कायापालट करण्यासाठी प्रयत्नशील राहील.
या निवडणुकीत स्थानिक मुद्देच प्रभावी असतील, स्थानिक खासदार जर २०-२० वर्षे जनतेच्या संपर्कात राहणारा नसेल, त्यांच्या अडचणी सोडवत नसेल तर उपयोग नाही. राष्ट्रीय पातळीवरील मुद्द्यांनी पोट भरत नसते. मला लोक कामे करणारा प्रामाणिक नेता म्हणून ओळखतात. त्यांचा माझ्यावर विश्वास आहे, त्यामुळे प्रचारात मला सगळीकडे चांगला प्रतिसाद मिळतोय. जनतेत माझ्या उमेदवारीमुळे उत्साह आहे, मला नक्की तीन ते पाच लाखांचे मताधिक्य मिळेल, अशी माझी खात्री आहे.
नगर पालिकेतील घरकुल घोटाळ्याबद्दल काही लोक माझ्यावर आरोप करतात. पण त्यातून अद्याप काहीही सिद्ध झालेले नाही. आम्ही सगळ्यांनी त्यावेळी गरीब झोपडी धारकांना घरे मिळतील, या चांगल्या भावनेतून त्या ठरावावर सह्या केल्या होत्या, भ्रष्टाचार केलेला नाही. मी नेहमीच पारदर्शकपणे कामे केली आहेत, न्यायालयाच्या निकालातून हे नक्कीच सिद्ध होईल, असा मला विश्वास आहे.
भारतीय जनता पक्ष स्वतःला शिस्तबद्ध पक्ष म्हणवून घेत होता पण सत्ता आल्यावर ही शिस्त बिघडली आहे, हे आपण सगळ्यांनी अमळनेर आणि भडगाव येथे घडलेल्या प्रकारांमधून बघितले आहे. त्यांच्यात लाथाळ्या सुरु झाल्या आहेत, पैशांच्या जोरावर निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न ते करत आहेत. पण जनता आता त्यांना साथ देणार नाही. लोक मला ओळखतात, त्यांनी कुठल्याही भूल-थापांना व आश्वासनांना बळी न पडता मतदान करावे आणि मला प्रचंड बहुमताने निवडून द्यावे. असे माझे सगळ्या मतदारांना आवाहन आहे.
पहा : गुलाबराव देवकर नेमके काय म्हणालेत ते !